'बफर झोनमुळे निस्तार हक्कांवर गदा; हक्क न मिळाल्यास काढणार धडक मोर्चा'

विनायक रेकलवार
Saturday, 17 October 2020

गेल्या तीन वर्षांपासून बफर झोनच्या क्षेत्रात करवन, काटवन, चिचोली, टोला ही चार गावे सापडली आहेत. यापूर्वी ग्रामस्थांना त्यांचे हक्क मिळत होते. परंतु, आता वनविभागाचे नियम लागल्यानंतर निस्तार हक्कापासून  वंचित ठेवले जात आहे.

मूल (जि. चंद्रपूर): वनविभागाच्या बफर झोनच्या नियमामुळे आमच्या अधिकारांवर गदा येत आहे. सरकारने त्यांचे जंगल, वन्यप्राणी सांभाळावे आणि आमचे लोक, आमचे जनावरे आम्हाला सांभाळू द्यावे. त्यासाठी निस्तार हक्कासह वनातील आमचा हक्क आम्हाला द्यावा. अन्यथा धडक मोर्चा काढण्याचा इशारा आदिवासी बहुल चार गावातील नागरिकांनी वनविभागाला दिला. सोमवारी मूल येथील विश्रामगृहात पत्रकार परिषद घेण्यात आली. 

गेल्या तीन वर्षांपासून बफर झोनच्या क्षेत्रात करवन, काटवन, चिचोली, टोला ही चार गावे सापडली आहेत. यापूर्वी ग्रामस्थांना त्यांचे हक्क मिळत होते. परंतु, आता वनविभागाचे नियम लागल्यानंतर निस्तार हक्कापासून  वंचित ठेवले जात आहे. चराई क्षेत्राला मर्यादा घालून देत आहेत. बफर क्षेत्रात गुरांना चराईसाठी नेल्याशिवाय पर्याय नाही. परंतु, येथील जंगली श्वापदांमुळे गुराखी आणि जनावरे बळी पडत आहेत.  त्यामुळे जनावरे विकण्याची नामुष्की ओढावल्याचे नागरिकांनी सांगितले. गावकऱ्यांना  निस्तार हक्काची गरज आहे. ते मिळवायचे कसे आणि आमची जनावरे चरायला कुठे  न्यायची? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

हेही वाचा - ऐका हो ऐका! ३१ डिसेंबर पूर्वी करा घराची खरेदी; सरकारने दिली गोड बातमी

संबंधित चारही गावातील नागरिकांना पट्टेदार वाघ, बिबट, अस्वल, रानडुक्करे या वन्यप्राण्यांच्या भितीपोटी दहशतीत  जीवन घालवावे लागत आहे. वाघाने गुराख्यांना आणि जनावरांना ठार मारले. रानडुक्करांमुळे धान शेती उद्ध्वस्त होत आहे. मानव वन्यजीव संघर्षामुळे जीव मेटाकुटीला आल्याचे नागरिकांनी सांगितले. बफर झोनमुळे वन्यप्राणी मोकळे झाले. परंतु, आम्हाला भितीपोटी बंदीस्त व्हावे लागत असल्याची खंत या नागरिकांनी बोलून दाखविली.

हेही वाचा - रस्त्यावरील खड्डे नव्हे हे तर यमदूतच, जागोजागी उखडली...

गावाला लागून असलेल्या बफर झोनच्या जंगलाला वन संरक्षण भिंत उभारावी, निस्तार हक्काचा लाभ द्यावा, चराई क्षेत्र ठरवून द्यावे, अशी मागणी करवन येथील माजी सरपंच साईनाथ मंगाम यांनी  पत्रकार परिषदेत केली. वनविभागाच्या बफर झोनने पावले उचलले नाहीतर वनविभागावर धडक मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी दिला. यावेळी प्रेमनाथ गेडाम, आनंद राव शेंदरे, मनोज ठाकरे, रविंद्र बोकारे आदी शेतकरी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tribal people demanding their right regarding with forest in mool of chandrapur