
विशेष म्हणजे मेळघाटमधील लहान मुलांच्या मृत्यूला आळा बसल्याचा दावा आरोग्य विभागाकडून वारंवार केला जातो. मात्र, प्रत्यक्षात आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टर तसेच आरोग्य कर्मचारीच वेळेवर हजर राहत नसल्याने अशा प्रसंगांना तोंड द्यावे लागत असल्याचे बघायला मिळत आहे.
चिखलदरा (जि. अमरावती) : मेळघाटच्या अतिदुर्गम गावातील दोन गोंडस जुळ्या बाळांचा रुग्णवाहिका न मिळाल्याने उपचाराअभावी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना रायपूर येथे उघडकीस आली. या घटनेनंतर मेळघाटातील आरोग्ययंत्रणेची लक्तरे वेशीला टांगली गेली असून, आरोग्य विभागाचे दावे फोल ठरले आहे.
मेळघाटमधील अतिदुर्गम रायपूर गावातील लक्ष्मी शिवकुमार ठाकरे (वय २०) या महिलेची प्रसूती शुक्रवारी (ता. १९) रायपूर येथे झाली. संबंधित महिलेने गोंडस जुळ्या बाळांना जन्म दिला. मात्र, प्रसूतीनंतर अवघ्या काही वेळातच माता व बाळांची प्रकृती अचानक बिघडली. त्यावेळी रायपूरच्या आरोग्य उपकेंद्रात डॉक्टर व आरोग्य कर्मचारी उपस्थित नव्हते, असा ग्रामस्थांचा आरोप आहे.
अधिक माहितीसाठी - नागरिकांनो! सोन स्वस्त, आताच करा खरेदी; लवकरच होणार विक्रमी दर?
विशेष म्हणजे, वेळेवर रुग्णवाहिकासुद्धा उपलब्ध झाली नाही. त्यामुळे बाळंतीण महिला व बाळांना खासगी वाहनाने सेमाडोह येथे आणण्यात आले. मात्र, तेथे एक बाळ दगावले तर दुसऱ्याने अमरावतीला आणताना प्राण सोडला.
आरोग्ययंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे दोन चिमुकल्यांना प्राण गमवावे लागले. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी सरपंच निशा सेमलकर तसेच ‘प्रहार’चे उपजिल्हाप्रमुख रमेश तोटे यांनी केली. आतातरी आरोग्य विभागाला जाग येईल का, असा प्रश्न आदिवासी बांधवांनी उपस्थित केला आहे.
विशेष म्हणजे मेळघाटमधील लहान मुलांच्या मृत्यूला आळा बसल्याचा दावा आरोग्य विभागाकडून वारंवार केला जातो. मात्र, प्रत्यक्षात आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टर तसेच आरोग्य कर्मचारीच वेळेवर हजर राहत नसल्याने अशा प्रसंगांना तोंड द्यावे लागत असल्याचे बघायला मिळत आहे.
जाणून घ्या - यवतमाळ जिल्ह्यात 28 फेब्रुवारीपर्यंत संचारबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; जाणून घ्या नियम
प्रकरणाची माहिती घेऊन चौकशी केली जाईल
संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन चौकशी केली जाईल. चौकशीमध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.
- डॉ. दिलीप रणमले,
जिल्हा आरोग्य अधिकारी, अमरावती