घृणास्पद, दोन भावंडांचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 डिसेंबर 2019

पीडिता 14 वर्षांची अल्पवयीन असून ती मूळ लाखनी तालुक्‍यातील रहिवासी आहे. आई-वडील विभक्त झाल्यामुळे ती आईसोबत बुटीबोरी एमआयडीसीनजीकच्या टेंभरी येथे राहते. आई एका रेस्टहाउसमध्ये मजुरीचे काम करते. पीडिता तिच्या मूळगावी शिक्षण घेत होती.

टाकळघाट (जि. नागपूर) : येथील गंगापूर परिसरात राहणाऱ्या दोन सख्या भावांनी अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. या प्रकरणी एमआयडीसी बोरी पोलिसांनी आरोपी आकाश संजय कारमोरे (वय 27) व त्याचा सख्खा भाऊ शुभम (वय 21, दोघेही रा, गंगापूर झोपडपट्टी, टाकळघाट) यांना अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता 14 वर्षांची अल्पवयीन असून ती मूळ लाखनी तालुक्‍यातील रहिवासी आहे. आई-वडील विभक्त झाल्यामुळे ती आईसोबत बुटीबोरी एमआयडीसीनजीकच्या टेंभरी येथे राहते. आई एका रेस्टहाउसमध्ये मजुरीचे काम करते. पीडिता तिच्या मूळगावी शिक्षण घेत होती. दिवाळीनंतर ती आईकडे टेंभरी येथे आली होती. यातील आरोपींनी पीडितेचा भ्रमणध्वनी क्रमांक मिळविला व तिला फोनवरून आमिष देऊन फूस लावून पळविले. 

महिनाभरापूर्वी केले होते अपहरण 
पीडिता महिन्याभरापासून घरी नसल्याने पीडिताची आईने शनिवारी एमआयडीसी बोरी पोलिसात ती बेपत्ता असल्याची तक्रार दिली. ही बाब आरोपीच्या नातेवाइकांना कळल्याने ते पीडितेला घेऊन पोलिस ठाण्यात हजर झाले. पोलिसांनी पीडितेला विचारपूस केल्यावर आरोपी आकाशने आमिष देऊन अनेकदा तिच्यावर बलात्कार केल्याचे सांगितले.

सोबतच आकाशने पीडितेला गंगापूर येथे त्याच्या मामाच्या घरी पीडितेला आईवडील नसल्याचे सांगून येथेच ठेवण्याचा आग्रह केला. दरम्यान, त्याचा लहानभाऊ शुभम याने पीडितेशी जवळीक साधून त्याने पीडितेवर वारंवार बलात्कार केला असा जबाब दिला. यावरून एमआयडीसी पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

असे का घडले? - दोन दिवसांपूर्वी झाली होती बेपत्ता, अखेर सापडला मृतदेह

तक्रारीनंतर आकाशचे पलायन 
आरोपीचा शोध घेत असताना पोलिस उपनिरीक्षक दिनकर दराडे यांना शुभम हा टाकळघाट येथील वित्तुबाबा मंदिर परिसरात दिसला. त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केल्यावर त्याने त्याचा भाऊ आकाश हा वर्धा येथे पळून गेल्याची माहिती दिली. त्याचा मोबाईल ट्रेस करून ठाणेदार विनोद ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक दराडे व अशोक तलमले, किशोर डेकाटे, इकबाल शेख, प्रफुल राठोड, रमेश नांगरे, अमोल पारेकर यांच्या चमूने सेलू तालुक्‍यातील आमगाव येथून आकाशला अटक केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two brothers raped minor girl in nagpur district