यवतमाळ जिल्ह्यात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू...आकडा पोहोचला ३६वर

रवींद्र शिंदे
Wednesday, 5 August 2020

देशाच्या ग्रामीण भागातही कोरोना विषाणूचा कहर जाणवत आहे. या आजारामुळे जिल्ह्यात आजवर अनेकांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात बुधवारी (ता. ५) दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.

यवतमाळ : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड व विविध कोविड केअर सेंटरमधील दाखल १०२ जण उपचारानंतर बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात दोन कारोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृत्यूची एकूण संख्या ३६ झाली असून, आज बुधवारी (ता. ५) नव्याने २४ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

 

बुधवारी मृत झालेल्या दोन जणांमध्ये यवतमाळ शहरातील लक्ष्मीनगरातील ६५ वर्षीय वृद्ध महिला व ढाणकी रोड, उमरखेड येथील ७५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये पुसद तालुक्‍यातील श्रीरामपूरमधील एक पुरुष व पिंपळगाव येथील एक महिला, पुसदच्या वसंतनगरातील तीन महिला व एक पुरुष, उमरखेडमधील दोन पुरुष व दोन महिला, नेर तालुक्‍यातील घारफळ येथील एक महिला, नेरमधील तीन महिला, दारव्हा शहरातील एक पुरुष व एक महिला, पांढरकवडा येथील एक पुरुष, यवतमाळ शहरातील नेहरू चौकातील एक पुरुष व एक महिला, वंजारीफैल येथील एक पुरुष, संजीवनी हॉस्पिटल येथील एक पुरुष, वडगाव येथील एक महिला, विश्वकर्मानगर पिंपळगाव येथील दोन महिला पॉझिटिव्ह आले आहेत.

 

१०२ जणांना सुटी

जिल्ह्यात मंगळवारपर्यंत (ता. ५) एकूण ४४० ॲक्‍टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण होते. त्यात एकाचा मृत्यू झाल्याने ही संख्या ४३९ झाली. त्यात आज बुधवारी नव्याने २५ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडल्याने ही संख्या आता ४६४ झाली. मात्र, यापैकी एकाचा मृत्यू व "पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह' झालेल्या १०२ जणांना सुटी झाल्याने सद्यःस्थितीत जिल्ह्यात ॲक्‍टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३६१ एवढी आहे.

असं घडलंच कसं : आता यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर नवेच संकट.. हे आहे कारण...

आयसोलेशन वॉर्डात १३१ जण भरती

जिल्ह्यात सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १,३०९ झाली आहे. त्यापैकी ९१२ जण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३६ जणांच्या मृत्यूची नोंद आहे. सद्यःस्थितीत आयसोलेशन वॉर्डात १३१ जण भरती आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने बुधवारी ७६ नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. सुरुवातीपासून आतापर्यंत २१ हजार ७३२ नमुने पाठविले आहेत. त्यापैकी १७ हजार ५५९ प्राप्त व ४,१७३ अप्राप्त आहेत. शिवाय १६ हजार २५० नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

(संपादन  : दुलिराम रहांगडाले)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two corona positive patient deaths in the yavatmal district