तीन तासांत दोघांचा मृत्यू; भंडारा येथील आयसोलेशन वॉर्डातील घटना

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 18 April 2020

दोन्ही रुग्ण आयसोलेशन वॉर्डात भरती असल्याने त्यांचे घशाचे नमुने तपासनीसाठी नागपूरला पाठविण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतरच ते कोरोना बाधित होते की नाही हे स्पष्ट होईल. सध्यातरी आजाराने मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी म्हटले आहे. 

भंडारा : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात "कोरोना'बाधित रुग्णांसाठी विशेष आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आले आहेत. या वॉर्डात शुक्रवारपर्यंत 21 जणांचे विलगीकरण केले होते. रात्री दहा वाजताच्या सुमारास यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. मध्यरात्री एक वाजता दुसऱ्या रुग्णाचा मृत्यू झाला. आयसोलेशन वॉर्डात तीन तासांत दोघांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. 

भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात तयार केलेल्या आयसोलेशन वॉर्डात शुक्रवारपर्यंत 21 जणांचे विलगीकरण केले होते. मात्र, यातील दोघांचा मृत्यू झाल्याने रुग्णालयात एकच खळबळ उडाली. मृतांमध्ये तुमसर तालुक्‍यातील सत्तर वर्षीय रुग्ण असून, त्याच्यावर तुमसर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याला मधुमेहाचा आजार होता. प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी गुरुवारी (ता. 16) जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्यांना आयसोलेशन वॉर्डात दाखल करून उपचार करण्यात येत होते. शरीरातील विविध अवयवांनी काम करणे बंद केल्याने त्यांचा मृत्यू झाला.

अधिक वाचा - ...म्हणून वडिलांनाच कराव लागले दोन वर्षीय मुलाचे मुंडण

दुसरा मृत रुग्णही सत्तर वर्षीय असून, गोपीवाडा येथील रहिवासी आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होता. प्रकृती अधिकच खराब झाल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्यांना हायपरटेंशन आणि निमोनियाचा आजार होते. सोबत कॅन्सर देखील असल्याची माहिती पुढे आली आहे. 

दोन्ही रुग्ण आयसोलेशन वॉर्डात भरती असल्याने त्यांचे घशाचे नमुने तपासनीसाठी नागपूरला पाठविण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतरच ते कोरोना बाधित होते की नाही हे स्पष्ट होईल. सध्यातरी आजाराने मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी म्हटले आहे. 

दोघांनाही वेगवेगळे आजार 
दोन्ही मृत रुग्णांना वेगवेगळा आजार होता. एकाला मधुमेह तर दुसऱ्याला हायपरटेंशन व निमोनिया होता. दोन्ही रुग्णांच्या घश्‍याचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. अहवाल आल्यानंतरच कोरोना बाधित होते की नाही, हे सांगता येईल. तोपर्यंत कोणीही अफवा पसरवू नये. 
- डॉ. प्रमोद खंडाते, 
जिल्हा शल्यचिकित्सक, भंडारा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two die in district general hospital at Bhandara