
यश हा अनुप व लकी या मित्रांसोबत दुचाकीने खापरखेडाकडून पारशिवनीकडे येत होता. अशातच आमडी फाट्याकडून सावनेरकडे जाणाऱ्या खासगी बसने दुचाकीस जोरात धडक दिली.
पारशिवनी (जि. नागपूर) : भरधाव ट्रॅव्हलने दुचाकीस धडक दिली. या अपघातामध्ये दोघेजण जागीच ठाप झाले. यश भालेराव (वय१३ ), अनुप अतुल पनवेलकर( वय१४), असे मृतांची नावे आहेत, तर लकी चव्हाण हा जखमी असून बुधवारी सायंकाळी ही घटना घडली आहे.
हेही वाचा - बसण्यापूर्वीच करा वयाचा विचार, अन्यथा खावी लागणार तुरुंगाची हवा; जाणून घ्या 'हे...
यश हा अनुप व लकी या मित्रांसोबत दुचाकीने खापरखेडाकडून पारशिवनीकडे येत होता. अशातच आमडी फाट्याकडून सावनेरकडे जाणाऱ्या खासगी बसने दुचाकीस जोरात धडक दिली. यात यश भालेराव व अनुप पनवेलकर या दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. लकी चव्हाण हा जखमी झाला. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. खासगी बसचालकाने आपली गाडी खापा येथील पोलिस ठाण्यात जमा केली. खासगी बसचालक प्रकाश डहारे (४५, राहणार मूलताई) याला अटक करण्यात आली. या अपघातामुळे गुरुवारी सकाळी ८ वाजतापासून चौकात 'रास्तारोको' आंदोलन करण्यात आले.
हेही वाचा - 'राणा दाम्पत्य म्हणजे नाटक कंपनी'
नागरिकांची मागणी -
छत्रपती शिवाजी महाराज चौकासोबतच साई ले आऊट चौक, बँक ऑफ इंडिया चौक, शासकीय रुग्णालय, तहसील कार्यालय चौक, महात्मा गांधी चौक या ठिकाणी तत्काळ गतिरोधक लावण्यात यावे, दिवाणी व फौजदारी न्यायालय ते महात्मा गांधी महाविद्यालय या रस्त्यावरील लाईट सुरू करण्यात यावे, चौकात वाहतूक पोलिस ठेवण्यात यावे, रस्त्यावर ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात यावे, या आंदोलकांच्या प्रमुख मागण्या होत्या. यावेळी तहसीलदार वरूनकुमार सहारे, पोलिस निरीक्षक संतोष वैरागडे उपस्थित होते. रामटेक, देवलापार, कन्हान येथील पोलिसदेखील आंदोलनाची तीव्रता पाहून घटनास्थळी दाखल झाले होते. दुपारी दोनच्या सुमारास आमदार आशिष जैस्वाल आंदोलनस्थळी आले. त्यांनी आंदोलकांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले. त्यांनी भ्रमणध्वनीवर सक्षम अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तीन दिवसात मागण्या पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन दिले. आमदारांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात नगराध्यक्ष प्रतिभा संजय कुंभलकर, सलीम बाघाडे, भुजंग ढोरे, विजय भुते , रुपेश खंडारे यासह ग्रामस्थांनी भाग घेतला होता.