पहाटे तीन वाजता सुरू होती वाळूची तस्करी अन्‌ गाढ झोपेत असलेल्या गावकऱ्यांना मिळाली ही बातमी...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 May 2020

गुरुवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास तांबाडी घाटातून एमएच 34 एल 9458 क्रमांकाचा ट्रॅक्‍टर वाळूचा भरणा करून तुळशी-जेवरा मार्गाने निघाली. ट्रॅक्‍टरवर धानोली तांडा गावातील अनिल परचाके, देवराव नैताम, रामराव परचाके, शंभू मडावी हे चार मजूर ट्रॅक्‍टरवर बसले होते. 

चंद्रपूर : वाळूचा लिलाव झाल्याशिवाय विक्री करता येत नाही. मात्र, काही वाळू तस्करांनी अधिकाऱ्यांना आपल्या हाताशी धरून वाळू तस्करीचा गोरखधंदा सुरू केला आहे. जास्त फायद्यासाठी वाळूची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याचे आपण अनेकदा ऐकले आहेत. यासाठी रात्रीअपरात्री चोरी केली जाते. अवैध वाळूची चोरी व वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई होत असली तरी यात काहीही केल्या कमी आलेली नाही. वाळू चोरीच्या प्रयत्नात अनेकांना अटक तर जिवही गमवावा लागला आहे. अशाच एका घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या कोरपना तालुक्‍यात वाळू तस्करीला उधाण आले आहे. पैनगंगा-वर्धा नदीतील पात्रातून चोर मार्गाने वाळूची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू असते. वाळू वाहतूक करणारे वाहने रात्री-बेरात्री धावत असतात. याबाबत अनेकदा तक्रार करूनही काही उपयोग झालेला नही. गुरुवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास तांबाडी घाटातून एमएच 34 एल 9458 क्रमांकाचा ट्रॅक्‍टर वाळूचा भरणा करून तुळशी-जेवरा मार्गाने निघाली. ट्रॅक्‍टरवर धानोली तांडा गावातील अनिल परचाके, देवराव नैताम, रामराव परचाके, शंभू मडावी हे चार मजूर ट्रॅक्‍टरवर बसले होते.

जाणून घ्या - सतत प्रियकरासोबत फोनवर बोलत होती पत्नी, पतीने अर्ध्या रात्री केले हे...

दरम्यान, चालकाचे ट्रॅक्‍टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्‍टर रस्त्यावरच पलटी झाला. ट्रॅक्‍टरखाली दबल्याने अनिल परचाके व देवराव नैताम या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. रामराव परचाके व शंभू मडावी हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही बाब नागरिकांनी समजताच त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. यानंतर नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठत जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तसेच मृतदेह उत्तरीयतपासणीसाठी पाठवले. 

वाळू तस्करी जोरात

वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्‍टर पलटून दोन मजुरांचा गुरुवारी जागीच मृत्यू झाला. तर दोघे जण गंभीर जखमी झालेत. ही घटना कोरपना तालुक्‍यातील तुळशी-जेवरा मार्गावर घडली. यामुळे वाळू तस्करीचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. कोरपणा तालुक्‍यात राजरोषपणे वाळू तस्करी सुरू आहे. तस्करांना महसूल विभाग पोटाशी घेत असल्याचा आरोप होत आहे. मात्र, याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करण्यात येत आहे.

हेही वाचा - लाॅकडाउनमध्ये प्रेमीयुगूल झाले सैराट, का वाढली पळापळी?...वाचा

गावात शोककळा

वाळूच्या ट्रॅक्‍टरखाली दबून दोघांचा मृत्यू झाल्याचे समजताच धानोली तांडा गावात शोककळा पसरली आहे. कारण, दोन्ही मृत याच गावचे रहिवासी आहेत. तर पलटी झालेला ट्रॅक्‍टर कोरपना नगर परिषदेतील नगरसेवकाच्या मालकीचा असल्याची माहिती आहे. यामुळे वाळू तस्करीत नगरसेवकाचा सहभाग तर नाही ना? या दिशेने पोलिस तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two died at chandrapur district