esakal | बसची दुचाकीला धडक, दोन तरुण जागीच ठार
sakal

बोलून बातमी शोधा

accident

बसची दुचाकीला धडक, दोन तरुण जागीच ठार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दिग्रस (जि. यवतमाळ) : येथील पुसद मार्गावरील देवनगर-पुसद बायपासजवळ एसटी बसने दुचाकीला जोरदार धडक (accident on devnagar pusad bypass) दिली. यामध्ये दोन तरुण जागीच ठार झाले, तर दुचाकी बसखाली येऊनही एक तरुण सुदैवाने बचावला आहे. हा अपघात शनिवारी (ता.17) दुपारी 12 वाजता झाला. रवी रमेश पुंडे (वय 17) व पवन मुन्शिराम गावंडे (वय 18, दोघेही रा. देवनगर, दिग्रस) मृतांची नावे आहेत. (two died in two wheeler and bus accident in digras of yavatmal)

हेही वाचा: अवघ्या तीन क्लिकमध्ये मिळेल रुग्णवाहिका, तरुणानं तयार केलंय भन्नाट अ‌ॅप

केशव प्रल्हाद चव्हाण (रा. श्रीराम विहार, दिग्रस) असे जखमीचे नाव आहे. देवनगरातील दोन तरुण दिग्रसपासून जवळच असलेल्या वाईगौळ येथे स्वस्त धान्य आणण्यासाठी सकाळी गेले होते. धान्य घेऊन पुसद बायपासने घरी येत होते. त्याचवेळी चंद्रपूरकडे जाणार्‍या परभणी आगाराच्या बसने (क्रमांक एमएच 20 बीएल 2527) दुचाकीला (क्रमांक एमएच 29 बीएम 4234) विरुद्ध दिशेने येऊन समोरून जबर धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील एक युवक हा जागीच ठार झाला व दुसर्‍याला रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. हा अपघात पाहत असताना दुचाकीवरील (क्रमांक एमएच 38 वाय 6439) नियंत्रण सुटल्याने दिग्रसहून पुसदकडे जाणारा दुचाकीस्वार बसच्या समोरच्या दोन्ही चाकांच्यामध्ये गेला. मात्र, बसचालकाने तत्काळ बस थांबविल्याने व दुचाकीस्वार विरुद्ध दिशेने फेकला गेल्याने तो आश्‍चर्यकारकरीत्या बचावला. त्याने घटनास्थळावरून थेट रुग्णालयात धाव घेतली व प्राथमिक उपचार घेऊन तो घरी गेल्याची माहिती आहे. दरम्यान, अपघातातील दोन्ही मृत देवनगरातील रहिवासी आहेत. म्हणून देवनगरसह संपूर्ण दिग्रस शहरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

काही काळ वाहतूक खोळंबली -

अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सोनाजी आमले ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून नगरसेवक केतन रत्नपारखी व दिनेश खाडे यांनी रुग्णवाहिकेतून जखमी व मृतास ग्रामीण रुग्णालयात पोहोचविले. नागरिकांनीही घटनास्थळी गर्दी केल्याने दिग्रस-पुसद मार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती. मात्र, ठाणेदार आम्ले यांनी गर्दी कमी करीत तत्काळ वाहतूक सुरळीत केली.

loading image