वरुडच्या दोन युवकांचा शेकदरी धरणात बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 4 June 2020

धरणावर पोहोचल्यानंतर तिघेही थोडे खाली उतरले त्या ठिकाणी असलेल्या मुरुमाच्या गंजावर बसले असतांना अब्दुल आरीश याचा पाय अचानक घसरला आणि तो पाण्यास पडला.

वरुड(अमरावती) : मृत्यू कुठे दबा धरून बसलेला असेल सांगता येत नाही. मृत्यू वय बघत नाही आणि वेळही बघत नाही. निसर्गाचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा असाच पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी तालुक्‍यातील शेकदरी धरणामध्ये घडली. या घटनेने वरुड शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्राप्त माहितीनुसार, गव्हाणकुंड येथील माजी पोलिस पाटील सलीम खॉ पठाण यांच्या शेतामध्ये त्यांचा नातेवाईक मोहम्मद मुश्‍फीक हा त्याचा मित्र अब्दुल आरीश याला घेऊन गव्हाणकुंड शेतशिवारामध्ये आला होता. गव्हाणकुंड येथे आल्यानंतर या दोघांनी सलीम खॉ पठाण यांचा नातू अकमल याला सुध्दा सोबत घेतले. तिघेही शेतात गेल्यानंतर बाजुलाच असलेल्या शेकदरी धरणावर गेले. धरणावर पोहोचल्यानंतर तिघेही थोडे खाली उतरले त्या ठिकाणी असलेल्या मुरुमाच्या गंजावर बसले असतांना अब्दुल आरीश याचा पाय अचानक घसरला आणि तो पाण्यास पडला. आरीश पाण्यात पडल्याचे लक्षात येताच मोहम्मद मुश्‍फीक याने आरीशला वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु तोही पाण्यामध्ये पडला. दोघेही पाण्यात पडल्याचे आणि बुडाल्याचे लक्षात येताच अकमल हा तातडीने धरणाच्या बाजुला असलेल्या रस्त्यावर आला. त्याने सायकलने जात असलेल्या मजुरांना ही घटना सांगितली आणि सायकलने गव्हाणकुंडला पोहोचविण्याची विनंती केली. अकमल घरी आला आणि सलीम खॉ पठाण आणि कुटूंबातील सदस्यांना घडलेली घटना सांगितली. क्षणाचाही विलंब न लावता कुटूंबातील सदस्य गावातील लोकांना घेवुन घटनास्थळी गेले व काही वेळातच दोघांनाही पाण्याबाहेर काढले परंतु तोपर्यंत दोघांनाही मृत्यूने कवटाळले होते.
दोघेही मित्र हे अमरावती येथील पोट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकत होते. या दोन हुशार मित्रांचा अचानक मृत्यू झाल्याने वरुड शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अब्दुल आरीश अब्दुल वहीद  हा देशमुखपुरा परिसरात तर दुसरा मोहम्मद मुश्‍फीक मोहम्मद ईजाज  हा युवक शहरातील सती माता मंदीर परिसरातील रहिवाशी आहे.
घटनेची माहिती मिळताच ठाणेदार मगन मेहते यांचेसह पोलिस उपनिरिक्षक राजु चव्हाण,अशोक संभे, मनोज कळसकर, प्रशांत पोकळे यांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता रवाना केले. या घटनेने वरुड शहरात खळबळ माजली आहे.

सविस्तर वाचा - का घेतला महिलांनी घरीच वटपौर्णिमा साजरी करण्याचा निर्णय, वाचा

या प्रकरणी शोहेब खा शब्बीर खा पठाण यांचे फिर्यादीवरून वरुड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two friends died in dam