का घेतला महिलांनी घरीच "वटपौर्णिमा' साजरी करण्याचा निर्णय, वाचा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जून 2020

महिलांनी स्वतःचे आणि कुटुंबाचे आरोग्य लक्षात घेऊन घरीच वडाचे रोप लावून त्याचे पूजन करण्याचे आवाहन पर्यावरणप्रेमींकडून केले जात आहे

नागपूर  : ज्येष्ठ महिन्यात पावसाळ्याच्या तोंडावर येणारा "वटपौर्णिमा' हा महिलांचा सण नावाप्रमाणेच वटवृक्षाशी निगडित आहे. यंदा कोरोनाच्या संकटामुळे वडाच्या झाडाच्या शोधात न जाता घरीच वडाचे रोप लावून त्याचे पूजन करून वटपौर्णिमा साजरी करण्याचा निर्णय बहुतांश सुवासिनींनी घेतला आहे. त्यामुळे दरवर्षी असंख्य वडाच्या झाडांच्या होणाऱ्या कत्तलीला आळा बसणार आहे. 

नागपुरात बहरले सोनू सूदचे प्रेम; शंकरनगरातील ब्रेड पकोडा व कटिंग चहाचा होता दिवाना 

वटपौर्णिमेचे वेध लागताच उरल्यासुरल्या वडांच्या झाडांची कत्तल करून त्याच्या फांद्या विक्रीसाठी बाजारात आणल्या जातात. या फांद्याचे पूजन महिला करतात. सध्या मात्र कोरोनाचे संकट असल्यामुळे महिलांनी एकत्र येत घराबाहेर पडून वटपौर्णिमा साजरी करणे धोक्‍याचे आहे. एकत्रित सण साजरा केल्याने कोरोनाचा धोका संभवतो.

या पार्श्वभूमीवर महिलांनी स्वतःचे आणि कुटुंबाचे आरोग्य लक्षात घेऊन घरीच वडाचे रोप लावून त्याचे पूजन करण्याचे आवाहन पर्यावरणप्रेमींकडून केले जात आहे. त्याला बहुतांश महिलांनी सकारात्मक प्रतिसाद देत घरीच वटपौर्णिमा साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. वडाच्या झाडाखाली महिलांनी गर्दी केली, तर सोशल डिस्टन्सिंग पाळणे कठीण होईल. त्यामुळे घरीच वडाचे रोप लावून, अथवा चित्र काढून घरीच वटपौर्णिमा साजरी करावी, असे मत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केले आहे. 

झाड केले कमी उंच, फळे झाली टंच! 

कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता परिसरातच वडाचे रोप लावून त्याचे पूजन करण्याचा निर्णय आम्ही सर्व मैत्रिणींनी घेतला आहे. त्यानिमित्ताने मुलांनाही वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व जाणून घेता येईल. 
-रश्‍मी खोरे, गृहिणी. 

दिवसेंदिवस होत असलेल्या पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे तर वटपौर्णिमेच्या निमित्ताने का होईना, वडाचे पूजन आणि संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे झाले आहे. वडाचे झाडे हे दीर्घकाळ टिकणारे असून आयुर्वेदातही त्याचे अनेक फायदे आहेत. 
-रंजना साबळे, गृहिणी. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: women perform rituals at home