५६ हजार भरण्यास नगरपंचायत असमर्थ, अडीचशेवर घरकुलधारकांचा प्रश्‍न सुटेना

संदीप रायपुरे
Tuesday, 13 October 2020

शहरात अनेक कुटुंबीय अतिक्रमणधारक आहेत. या कुटुंबीयांनी अतिक्रमण करून घरे बांधली. मात्र, अजूनपर्यंत प्रशासनाने या बांधकामाला नियमित केले नाही. ५२ वर्षांपासून हा प्रश्‍न प्रलंबित पडून आहे. राममंदिर वॉर्डातदेखील नागरिकांची हीच समस्या आहे. मात्र, दीड महिना लोटूनसुद्धा नगरपंचायतीने अतिक्रमणधारकांच्या मोजणीचे पैसै भरले नाही.

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : गेल्या कित्येक वर्षांपासून वास्तव करणाऱ्या गरीब कुटुंबीयांना हक्काचे पट्टे देण्यात आले नाहीत. त्यामुळे अडीचशेवर कुटुंबीयांना घरकुल मंजूर होऊनही वंचित राहावे लागले आहे. त्यांना पट्टे द्यावे, या मागणीसाठी नाना येल्लेवार यांनी उपोषण केले. आमदार सुभाष धोटेंच्या मध्यस्तीनंतर महिनाभरात हा प्रश्‍न मार्गी लावण्याच्या अटीवर उपोषण मागे घेण्यात आले. मात्र, पट्टे देण्यासाठी ५६ हजारांची रक्कम भरण्यास नगरपंचायत असमर्थ ठरत आहे.

शहरात अनेक कुटुंबीय अतिक्रमणधारक आहेत. या कुटुंबीयांनी अतिक्रमण करून घरे बांधली. मात्र, अजूनपर्यंत प्रशासनाने या बांधकामाला नियमित केले नाही. ५२ वर्षांपासून हा प्रश्‍न प्रलंबित पडून आहे. राममंदिर वॉर्डातदेखील नागरिकांची हीच समस्या आहे. या गंभीर प्रकरणाची उकल करण्यासाठी भाजप ओबीसी मोर्चाचे तालुका महामंत्री प्रशांत येल्लेवार यांनी ऑगस्ट महिन्यात उपोषण केले. मात्र, नगरपंचायतीने त्याच दिवशी आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, दीड महिना लोटूनसुद्धा नगरपंचायतीने अतिक्रमणधारकांच्या मोजणीचे पैसै भरले नाही.

अवश्य वाचा : हवामान विभागाने दिला गंभीर इशारा; मंगळवारी विदर्भाला शेवटचा दणका बसण्याची दाट शक्यता

यामुळे या अतिक्रमणधारकांची समस्या लांबणीवर गेली आहे. अशातच आता नगरपंचायतीने पैसेच नसल्याचे कारण समोर केले आहे. त्यामुळे प्रशांत येल्लेवारांनी पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.

...तर २० ऑक्टोबरपासून उपोषण

येत्या २० ऑक्‍टोबरपासून उपोषणाला सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती भाजप पदाधिकाऱ्यांनी आयोजित पत्रकार परिषदेतून दिली. यावेळी तालुकाध्यक्ष बबन निकोडे, नगरसेवक राकेश पुन, नीलेश पुलगमकर, सुनील फुकट, गणपत चौधरी यांची उपस्थिती होती.

जाणून घ्या : सेंद्रिय शेतीच्या प्रयोगातून फुलविली मोसंबीची बाग, दोन एकरात वर्षाला तीन लाख उत्पन्न

करवसुली ठप्प  :  नगराध्यक्ष

सद्यःस्थितीत कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे करवसुली ठप्प पडली आहे. त्यामुळे सामान्य फंडामध्ये रक्कम शिल्लक नाही. म्हाडाकडून अजूनही मोजणीचे पैसे आले नाही. मात्र, अतिक्रमणधारकांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळावा, यासाठी आम्ही सकारात्मक आहो, अशी प्रतिक्रिया नगराध्यक्ष सपना साखलवार यांनी दिली.

(संपादन  : दुलिराम रहांगडाले)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two hundred and fifty family Deprived of homes