सावधान! पायी जाणाऱ्या मुलींनो, जरा सांभाळून..काय आहे प्रकरण... वाचा सविस्तर

संतोष ताकपिरे
Thursday, 17 September 2020

दरम्यान, रात्री साडेसातच्या सुमारास गाडगेनगरच्या पलाश लाइनमध्ये दुसरी घटना घडली. दोन मैत्रिणी पायदळ जात होत्या. त्यापैकी एकीचा मोबाईल तिच्या हातातच होता. दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्या युवकाने बेसावध असलेल्या युवतीच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढला.

अमरावती : शहरात आता चेनस्नॅचिंग सोबतच मोबाईल हिसकावून नेण्याचे प्रकार सुरू झाले असून, एकाच दिवशी दोन ते अडीच तासात पायदळ जाणाऱ्या तीन युवतींचे मोबाईल दुचाकीस्वारांनी जबरीने हिसकावून नेले. त्यापैकी एकीची छेडखानी केली.

गाडगेनगर व राजापेठ ठाण्याच्या हद्दीत सायंकाळी साडेसहा ते रात्री नऊच्या सुमारास या घटना घडल्या.

मंगळवारी (ता. 15) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास दस्तुरनगर ते गोंडबाबा मंदिर मार्गावर ही घटना घडली. संबंधित युवती आईसह घराकडे पायदळ जात असताना संशयित आरोपी विजय मदने याने पाठलाग करुन आधी त्या युवतीला अडविले, तिच्यासोबत अश्‍लिल भाषेत संभाषण करुन तिच्या जवळचा दहा हजार रुपयांचा मोबाईल जबरीने हिसकावून नेतांना तिचा विनयभंग केला.

युवतीच्या हातातील मोबाईल हिसकावला

दरम्यान, रात्री साडेसातच्या सुमारास गाडगेनगरच्या पलाश लाइनमध्ये दुसरी घटना घडली. दोन मैत्रिणी पायदळ जात होत्या. त्यापैकी एकीचा मोबाईल तिच्या हातातच होता. दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्या युवकाने बेसावध असलेल्या युवतीच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढला.

युवतीने आरडाओरड करेपर्यंत दुचाकीस्वार फरार झाला. त्यानंतर दीड तासातच रात्री नऊच्या सुमारास राजापेठ ठाण्याच्या हद्दीत एका हॉटेलसमोर दोघी मैत्रिणी पायदळ जात असताना त्यापैकी एकीच्या हातात असलेला दहा हजार रुपये किंमतीचा मोबाईल पाठलाग करणाऱ्या दुचाकीस्वाराने जबरीने हिसकावून नेला.

पोलिसांत केली तक्रार

दोन्ही युवतींच्या तक्रारीवरून गाडगेनगर व राजापेठ ठाण्यात अनोळखी दुचाकीस्वारांविरुद्ध जबरीचोरीचा गुन्हा दाखल झाला. आतापर्यंत शहरात पायदळ जाणाऱ्या महिलांचे दुचाकीस्वारांनी सोनसाखळी हिसकावल्याच्या घटना घडल्यात. आता लुटारुंच्या या नवीन फंड्यामुळे हातातील मोबाईलसुद्धा सुरक्षित राहिला नसल्याचे दिसून येते.

जाणून घ्या - चॉकलेट आणि पतंग घेऊन देण्याच्या बहाण्याने केले चिमुकल्याचे अपहरण; नेपाळमध्ये विकण्याचा होता प्लॅन; पण...

तीनपैकी दोन घटनांमागे एकच टोळी

शहरात मंगळवारी रात्री अडीच तासाच्या आत सारख्याच पद्धतीने तीन घटना घडल्या. त्यातील दोन घटनांमागे एकाच टोळीचा हात असल्याची शक्‍यता पोलिस आता पडताळून बघत आहेत.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The two motorcyclists snatched the mobile of the three girls at amravati