म्हशी तलावातील खोल पाण्यात गेल्या अन्‌ दोन भावांचा झाला घात...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 12 May 2020

म्हशी धूत असताना खोल पाण्यात जाऊ लागल्या. म्हशींना तलावात धुण्यासाठी गेलेल्या दोन भावंडांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना तुमसर तालुक्‍यातील पवनारखारी येथे सोमवारी (ता. 11) सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास घडली.

तुमसर (जि. भंडारा) : घरच्या म्हशी तलावात धुण्यासाठी घेऊन गेलेल्या दोन भावंडांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (ता. 11) सकाळी साडेदहाच्या सुमारास पवनारखारी येथे घडली. खुशाल ग्यानीराम शेंडे (वय 16), विशाल ग्यानीराम शेंडे (वय 14), दोघेही रा. पवनारखारी अशी मृत भावंडांची नावे आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

पवनारखारी येथील मृत मुलांचे वडील ग्यानीराम शेंडे हे डोंगरी बु. येथे रोजंदारी कामावर जातात. जोडधंदा म्हणून त्यांनी दुग्धव्यवसायासाठी म्हशी पाळल्या.

त्यांचा मोठा मुलगा खुशाल हा दहावीत; तर धाकटा विशाल हा नववीत शिकत होता. शाळेला सुट्या असल्याने सोमवारी (ता. 11) घरच्या म्हशींना आम्ही तलावावर धुण्यासाठी घेऊन जाऊ, अशी परवानगी त्यांनी वडिलांकडून घेतली होती.

मोठ्या भावाच्या मागे लहानही गेला

खुशाल आणि विशाल हे दोघेही ठरल्याप्रमाणे सकाळी दहाच्या दरम्यान गावाजवळील डोंगरी बु. मार्गावर असलेल्या तलावात म्हशी घेऊन गेले. म्हशी धूत असताना खोल पाण्यात जाऊ लागल्या. ते पाहून मोठा भाऊ खुशाल म्हशीच्या मागेमागे खोल पाण्यात गेला. मात्र तो बुडत असल्याचे पाहून धाकटा विशाल याने भावाला वाचविण्यासाठी धाव घेतली. परंतु दोघेही खोल पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले.

हेही वाचा : मोबाईलने केले सर्वसामान्यांच्या 'काॅइन बाॅक्स'ला हद्दपार...वाचा

रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू

दोघेही बुडाल्याचे पाहून तलावात पोहणाऱ्या इतर मुलांनी आरडाओरड करीत ही घटना गावात सांगितली. गावातील नागरिकांसह सरपंच, पोलिस पाटील यांनी तलावाकडे धाव घेतली. दोघांना तलावाच्या पाण्यातून काढले. त्यांना गोबरवाही येथील रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी गोबरवाही पोलिसांनी पंचनामा करून आकस्मिक घटनेची नोंद केली आहे. अधिक तपास पोलिस फौजदार ऋषीदास तांडेकर करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two siblings drown in lake

Tags
टॉपिकस
Topic Tags: