ते नक्षल्यांसाठी घेऊन जात होते दोन कोटी 20 लाख...मग अलगद अडकले पोलिसांच्या जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 3 June 2020

नक्षल सदस्यांना रक्कम पोहोचविण्याकरिता भामरागडला जाताना तेलंगणा राज्यातून महाराष्ट्राच्या सीमेलगत आलेल्या दोन वाहनांची तपासणी करण्यात आली. मात्र त्या वाहनांमध्ये दोन कोटी वीस लाखांची रक्कम आढळल्याने पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

सिरोंचा (जि. गडचिरोली) : तेलंगणा राज्यातून महाराष्ट्राच्या सीमेलगत आलेल्या दोन वाहनांची तपासणी केली असता त्या वाहनांमध्ये कोट्यवधी रुपयाची रक्कम आढळल्याने खळबळ उडाली आहे. सिरोंचा पोलिसांनी वाहनांसह दोघांना अटक केली असून त्यांच्याकडील दोन कोटी वीस लाख रुपये जप्त केले.

मंगळवारी (ता. 2) सकाळच्या सुमारास सिरोंचा पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे प्राणहिता व गोदावरी नदीच्या पुलावर नाकाबंदी करून तेलंगणा राज्याकडून आलेल्या दोन वाहनांची तपासणी केली असता त्या वाहनांमध्ये रक्कम असल्याचे निदर्शनास आले. याबाबत पोलिसांनी वाहनचालकाला विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संशय बळावला.

दोघांना केली अटक

त्यामुळे पोलिसांना वाहनात दोन थैल्यांमध्ये रक्कम सापडली. पोलिसांनी वाहन जप्त करून आरोपींना अटक केली आहे. स्कॉर्पिओ (क्र. एमएच 34, बीएफ 7221) तसेच इनोव्हा (टीएस 11- पीएन 0001) ही दोन वाहने गोदावरी पुलाच्या महाराष्ट्र सीमेवर जप्त करण्यात आली. संजय गंगाराम अवथरे रा. आष्टी व सुधीर पत्रु राऊत या दोघांना पोलिसांनी अटक केली.

नक्षल सदस्यांना पोहचवीत होते रक्कम

नक्षल सदस्यांना रक्कम पोहोचविण्याकरिता भामरागडला जाताना गोदावरी पुलावर पोलिसांनी वाहनांना अडवून जप्त केले. या दोघांचे भारत सरकारविरुद्ध कृत्य असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच प्राणहिता नदीच्या पुलावर दुसरे वाहन जप्त केले. त्या वाहनात 99 लाख 30 हजार रुपये मिळाले. ही रक्कम आयकर विभागाला पाठविल्याची माहिती पोलिस निरीक्षक अजय अहिरकर यांनी दिली.

जाणून घ्या : तरुणाला डॉक्टर बनविण्यासाठी स्वतःची झोळी रिकामे करणारे अबरारभाई...

नोटाबंदीनंतर दुसरी कारवाई

जिल्ह्यात नोटाबंदीच्या काळातही तेंदूपत्ता हंगाम सुरू होता. त्यावेळी पोलिसांनी दोन ठिकाणी कारवाई करून कंत्राटदारांकडून कोट्यवधी रुपयांची रक्कम जप्त केली होती. तेंदूपत्ता हंगामात मजुरांना मजुरी देण्यासाठी कंत्राटदार पैशाचे आर्थिक व्यवहार करीत असतात. विशेषतः तेलंगणा राज्यातील कंत्राटदार जिल्ह्यात तेंदूपत्ता खरेदीचे काम करीत असतात. यंदाही काही तालुक्‍यात तेथील कंत्राटदारांनी तेंदूपत्ता युनिटची खरेदी केली होती. मात्र, पोलिसांनी कोट्यवधीची रक्कम जप्त केल्याने मजुरांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two suspects arrested with Rs 2 crore in cash