हे काय चाललंय? दिवसाढवळ्या दोन लाख लुटले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

आरोपीने हिमांशूच्या पायाजवळ असलेली पैशाची पिशवी उचलून नागपूरच्या दिशेने पळ काढला. या घटनेची माहिती पोलिसांना कळताच एमआयडीसीचे ठाणेदार प्रदीप रायनावर व हिंगण्याचे ठाणेदार सारीन दुर्गे दोघेही घटनास्थळी पोहोचले.

हिंगणा (जि.नागपूर) : बॅंकेतून दोन लाख रुपये घेऊन निघालेल्या दुचाकीस्वाराला थांबवून त्याच्याकडील पैशाची बॅग घेऊन आरोपी फरार झाले. ही घटना बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास रायपूरलगत असलेल्या नागनदीच्या पुलाच्या काठावर घडली.

 

नागनदी पुलावरील घटना; आरोपी पसार
प्राप्त माहितीनुसार, हिमांशू विठ्ठल घोंगरे (वय 22, देवळी पेंढरी) याच्यासोबत त्याचा मित्र वानाडोंगरी येथील महेश दादाराव मुडे या दोघांनीही हिंगणा येथील युनियन बॅंकेतून त्यांच्या खात्यातील दोन लाख रुपये काढले. ही रक्कम वानाडोंगरी येथे त्यांच्या नातेवाइकाला देण्याचे हिमांशूच्या वडिलांनी सांगितले होते. बॅंकेतून पैसे काढल्यानंतर हिमांशूचा मित्र महेश हा दुसरे काम असल्याने निघून गेला. तर, हिमांशूने सर्व रक्कम एका प्लॅस्टिक पिशवीत भरून एकटा दुचाकीने वानाडोंगरीकडे येत असतानाच नागनदीच्या पुलावर अचानकपणे मागून दुसऱ्या दुचाकीने दोन आरोपी आले. "तुझे पैसे पडले' म्हणून थांबविले. हिमांशूने दुचाकी थांबवताच त्यापैकी मागे बसलेल्या आरोपीने हिमांशूच्या पायाजवळ असलेली पैशाची पिशवी उचलून नागपूरच्या दिशेने पळ काढला. या घटनेची माहिती पोलिसांना कळताच एमआयडीसीचे ठाणेदार प्रदीप रायनावर व हिंगण्याचे ठाणेदार सारीन दुर्गे दोघेही घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळ हे एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने त्यांनी तपास सुरू केला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस आयुक्त बालश्रीराम गायकर यांनीसुद्धा घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी बॅंकेतील सीसीटीव्ही फुटेज मिळविले. त्यात आरोपी दिसल्याचेही सांगण्यात येत आहे. तसेच हिंगणा पोलिस ठाण्यासमोर असलेल्या रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेरातसुद्धा दुचाकीवर दोन आरोपी हिमांशूचा पाठलाग करताना दिसत आहे. त्यापैकी चालकाने हेल्मेट घातले असले, तरी पाठीमागे बसलेल्या आरोपीचा चेहरा दिसत आहे. पोलिस या फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

पोलिस हद्‌दीचा वाद
दिवसाढवळया घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांत दहशत पसरली आहे. हिंगणा पोलिस ठाण्यापासून अगदी काही अंतरावरील ठिकाणी ही घटना घडल्यामुळे नागरिकांत आश्‍चर्य व्यक्‍त केले जात आहे. घटनेचे हे ठिकाण हिंगणा एमआयडीशी पोलिस हद्‌दीत येत असल्यामुळे हिंगणा पोलिस तत्परता न दाखविता कोसभ-यावरून येणा-या एमआयडीसी पोलिसांची प्रतीक्षा करीत असतात, याबद्‌दल आश्‍चर्य व्यक्‍त करण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The two-wheeler looted two lakhs a day