विहिरीला आले पाणी अन्‌ दगडात पिकविलेल्या शेतीची वाचा ही कहाणी! 

lonbehal
lonbehal

आर्णी (जि. यवतमाळ) : जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असली की, अडचणींवर सहज मात करता येते. योजनेचा लाभ नाही, शेती खडकाळ, दगडी आहे. अशा कोणत्याही कारणांचा पाढा न वाचता दाम्पत्याने दोन वर्षे घाम गाळून 30 फूट विहीर खोदली. त्यांची मेहनत फळाला येत विहिरीला पाणी लागले. आता अल्पभूधारक शेतकरी याच दगडी शेतीत भाजीपाला उत्पादन घेत आहेत. "मांझी' यांनी पत्नीच्या प्रेमापोटी पहाड खोदला तर, लोणबेहळ येथील मांझीने संसार फुलविण्यासाठी विहीर खोदली. 

"वाळूचे कण रगडिता तेलही गळे' ही म्हण सिद्ध करून दाखविली लोणबेहळ येथील रामदास दिगंबर पिलावन यांनी. आदिवासी शेतकऱ्यांसाठी शासनाच्या शेकडो योजना आहेत. मात्र, पिलावन यांच्यासाठी शासकीय योजना निष्फळ ठरल्या. कष्टाने जीवन जगण्याच्या निर्णयात पत्नीने अगदी निर्णायक साथ दिली. मेहनतीच्या जोरावर मिळालेल्या वडिलोपार्जित जमिनीचे सोनेच केले. लोणबेहळ ते शेंदुरसनी रोडवर गावालगत वडिलोपार्जित आठ एकर शेत आहे. दोन्ही भावंडांनी प्रत्येकी चार एकर शेती वाटून घेतली. कागदोपत्री मात्र एकत्र असल्याने त्यांना अल्पभूधारक योजनेचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे शेतात आतापर्यंत सरकारी योजनेमधून विहीर मिळू शकली नाही. 

कोरडवाहू शेती करण्यात काही अर्थ नाही, हे आर्थिक गणित त्यांना उमगले. सरकारी विहीर मिळत नाही, म्हणून रामदास व त्यांच्या पत्नीने मिळून रात्रंदिवस एक करून दुसऱ्याच्या शेतात मजुरी केली. वेळात वेळ काढून आपल्या शेतात स्वत:च विहीर खोदायला सुरुवात केली. सलग दोन वर्षे मेहनत घेऊन विहिरीचे खोदकाम 20 फुटांपर्यंत पूर्ण केले. त्यातच पाणी लागल्याने त्यांच्या परिश्रमाला फळ आले. नंतर त्यांनी त्याच शेतात असलेले संपूर्ण दगड, धोंडे वेचून घेतले. त्याच दगडाचा शेताला बांध करून माती भरली. दगडी शेतीला पिकविण्यायोग्य केली. बघता-बघता पडित जमिनीवर फळझाडे, भाजीपाला लागवड करून आपल्या कष्टाला सिद्ध करून दाखवले. 

गुंडाने पाणी देऊन करतात सिंचन 

आजही शेतकरी दांपत्य शेतातील लिंबू, आंबा, पपई, पेरू या फळझाडांना विहिरीमधून खिराडीने पाणी काढून गुंडानेच टाकतात. भाजीपाला पिकालाही याच पद्धतीने पाणी दिले जाते. सध्या त्यांनी कारले, काकडी, मिरचीची रोपे तयार केली आहेत. पिलावन दाम्पत्याची मेहनत करण्याची तयारी आहे. केवळ कागदपत्रांच्या अभावामुळे सरकारी योजनांचा लाभ घेता आला नाही. विहिरीतील पाणी उपसा करण्यासाठी साहित्य मिळावे, हीच माफक अपेक्षा आहे. 

वडिलोपार्जित असलेली शेती 50 वर्षे दुसऱ्या व्यक्तीच्या ताब्यात होती. शेतात दगड, धोंडे असल्याने येथे वीटभट्टी होती. त्यामुळे संपूर्ण शेत पडित होते. शेतातील सागाची झाडे त्यांनी विक्रीला काढली. तेव्हा सर्व्हे नंबर कोणते कोणाचे आहे, ते कळले आणि आमची चांगली जमीन त्याने व त्यांची पडित जमीन आम्हाला देण्यात आली. मेहनत करण्याची तयारी असल्याने हार मानली नाही. 
- रामदास पिलावन 
शेतकरी, लोणबेहळ (ता. आर्णी) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com