नुकसानामुळे दोन तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Two young farmers commit suicide due to loss

नुकसानामुळे दोन तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या

राजुरा (जि. चंद्रपूर) - पुराने उद्‍ध्वस्त झालेली शेती बघून तरुण शेतकरी खचला. त्याने शेतात कीटकनाशक प्राशन करून जीवन संपविले. ही घटना जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात येणाऱ्या कविटपेठ येथे शुक्रवारी घडली. अमित अनिल मोरे (वय २२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

जिल्ह्यात संततधार सुरू आहे. नद्या, नाल्या ओसंडून वाहत आहेत. पुराने अनेक गावांना वेढा दिला. हजारो नागरिकांना स्थलांतरित करावे लागले. पुराचा सर्वाधिक फटका शेतीला बसला. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली. हिरवीगार पिके कुजलीत. पुराचा पाण्याने शेतीला ओरबाडून काढले. कर्ज काढून उभी केलेली शेती उद्‍ध्वस्त झाल्याने राजुरा तालुक्यातील कविटपेठ येथील शेतकऱ्याचा धीर खचला. अमित अनिल मोरे याने कीटकनाशक प्राशन करून शेतातच जीवन संपविले.

अमितकडे सात एकर शेती आहे. मोठ्या भावाच्या मदतीने तो शेती करत होता. यावर्षी शेतात कापूस, सोयाबीनची पेरणी त्याने केली होती. मिरचीची रोपे शेतात उभी होती. मात्र, पावसाने घात केला. शेतीचे मोठे नुकसान झाले. शेतीचे झालेले नुकसान बघून हवालदिल झालेल्या अमितने टोकाचे पाऊल उचलले. घटनेची माहिती पोलिस पाटील प्रेरणा अनिल तेलसे यांनी विरूर पोलिस ठाण्याला दिली.

राळेगाव (जि. यवतमाळ) : धानोरा येथील शेतकरी प्रवीण सुरेश वाघ (वय २५) यांनी काल शुक्रवारी (ता. २२) विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. वीष घेतल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात दाल करण्यात आले. मात्र, आज शनिवारी (ता. २३) त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही. सततच्या पावसामुळे शेतातील झालेले नुकसान व असलेले कर्ज याला कंटाळून आत्महत्या केल्याचे समजते.

सहा वर्षांपूर्वी वडिलांनीही केली होती आत्महत्या

अमित मोरे याच्यावर दोन लाखांचे कर्ज होते. सहा वर्षांपूर्वी शेतीचे नुकसान बघून वडिलांनी आत्महत्या केली होती. आता मुलाने टोकाचे पाऊल उचलल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

शेतकऱ्याची मृत्यूशी झुंज संपली

मोताळा (जि. बुलडाणा : शेतीच्या वादातून कोथळी येथील नारायण भगवान तायडे (५३) यांना दोघांनी विषारी औषध पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना ८ जुलै रोजी कोथळी शिवारात घडली होती. दरम्यान, तायडे यांची शनिवारी (ता. २३) उपचारा दरम्यान बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात प्राणज्योत मालवली. तालुक्यातील कोथळी येथील शेतकरी नारायण भगवान तायडे (५३) हे कोथळी शिवारात भाडेपट्ट्याने शेती करीत होते. या शेतीवरून त्यांच्या शेजारी शेती असलेले साहेबराव विठोबा मोरे आणि सागर बाळू मोरे (दोघे रा. सहस्त्रमुळी) यांचे नारायण तायडे यांच्यासोबत दोन वर्षांपासून वाद होते.

तायडे हे ८ जुलै रोजी सायंकाळीच्या सुमारास शेतात असताना, साहेबराव मोरे आणि सागर मोरे हे दोघे जण त्या शेतात आले व तुझ्यामुळे आमचे पंधरा लाखांचे नुकसान झाले आहे असे म्हणून साहेबराव मोरे याने नारायण तायडे यांचे हात पकडले तर, सागर मोरे याने विषारी औषध तायडे यांच्या तोंडात टाकले. तसेच तू जर वाचला तर शेतात पाय ठेवायचा नाही, अशी धमकी देऊन दोघे जण निघून गेले. दरम्यान, अत्यवस्थ अवस्थेत असलेल्या तायडे यांना तातडीने उपचारासाठी बुलडाणा जिल्हा सामान्य रुगणालयात भरती करण्यात आले होते. यावेळी नारायण तायडे यांच्या जबाबावरून बोराखेडी पोलिसांनी ११ जुलैच्या रात्री उपरोक्त दोघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र जवळपास पंधरा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर तायडे यांनी शनिवारी (ता.२३) बुलडाणा येथील रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.

Web Title: Two Young Farmers Commit Suicide Due To Loss

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..