esakal | निराधार अनुदानाला तीन महिन्यांपासून लागला "ब्रेक'
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

निराधार नागरिकांना आधार म्हणून शासनाकडून निराधारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. यात संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना,  इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तिवेतन योजना आदींचा समावेश आहे.

निराधार अनुदानाला तीन महिन्यांपासून लागला "ब्रेक'

sakal_logo
By
बबलू जाधव

आर्णी (जि. यवतमाळ) : निराधार व्यक्तींना शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाचा मोठा आधार आहे. परंतु, हे अनुदान मागील तीन महिन्यांपासून मिळाले नाही. कोरोना विषाणू संकट काळात निराधार अनुदानाला "ब्रेक' लागल्याने लाभार्थ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

निराधार नागरिकांना आधार म्हणून शासनाकडून निराधारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. यात संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना,  इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तिवेतन योजना आदींचा समावेश आहे. स्वत:चा उदरनिर्वाह करण्यास असमर्थ असणाऱ्या निराधार व्यक्तींना या योजनेअंतर्गत आर्थिक साहाय्य देण्यात येते. 60 वर्षांहून अधिक वय असणारे वृद्ध, निराधार पुरुष, दहा वर्षांपेक्षा कमी वयाची मुले असणाऱ्या निराधार व आर्थिकदृष्ट्या असमर्थ, विधवा स्त्री आदींना या योजनेचा लाभ मिळतो. आर्णी तालुक्‍यात संजय गांधी निराधार सर्व साधारण लाभार्थी संख्या 3,100, संजय गांधी निराधार अनुसूचित जाती योजनेतील 573 लाभार्थी, संजय गांधी निराधार अनुसूचित जमाती योजनेतील 489 लाभार्थी, इंदिरा गांधी विधवा निवृत्तिवेतन योजनेतील 66 लाभार्थी आहेत.

मानोऱ्यात चितळाच्या शिकारीची बोंबाबोंब, मात्र निघाले कोंबडीचे मांस

 तर श्रावणबाळ सर्वसाधारण योजनेतील 6,902 लाभार्थी, श्रावणबाळ अनुसूचित जाती योजनेतील 342 लाभार्थी, श्रावणबाळ अनुसूचित जमाती योजनेतील 455 लाभार्थी आहेत, असे एकूण दोन्ही योजनेतील एकूण 11 हजार 927 लाभार्थी आहेत. मात्र, त्यांच्या मानधनाची रक्कम बॅंक खात्यात जमा होते. त्यामुळे निराधार नागरिक सर्वप्रथम बॅंकेत जाऊन अनुदान बॅंक खात्यात जमा झाले का, अशी विचारणा करी आहेत. अनुदान अजूनपर्यंत बॅंक खात्यात जमा झाले नाही, असे सांगितले जाते. त्यामुळे तहसील कार्यालयातील श्रावळबाळ व संजय गांधी निराधार कक्षात येऊन सदर अनुदानाविषयी विचारणा करण्यात येते. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या तीन महिन्यांत अनुदान आले नाही, असे उत्तर मिळते. तीन महिन्यांचे अनुदान तत्काळ देवून दिलासा देण्याची मागणी लाभार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

संजय गांधी व श्रावणबाळ योजनेतील मागील तीन महिन्यांची थकीत ग्रॅंन्ड प्राप्त झाली आहे. लवकरच संजय गांधी व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात सदर अनुदानाची रक्कम मिळणार आहे.
-धीरज स्थूल, तहसीलदार, आर्णी (जि. यवतमाळ).

-संपादन ः चंद्रशेखर महाजन 

loading image