बेरोजगारीवर मात करीत त्याने फुलवली भाजीपाल्याची शेती...इतर शेतकऱ्यांना मिळाली प्रेरणा

अक्षय कहालकर
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

पारंपरिक पद्धतीने धानाचे पीक घेताना बेरोजगार युवकाने प्रायोगिक तत्त्वावर अर्धा एकरात दोडक्‍याचे पीक लावले. एक-दोन पावसातच भेंडी व दोडक्‍याच्या वेलींनी शेत हिरवेगार दिसू लागले. सध्या बाजारात भेंडीला भाव मिळत नसला; तरी छोट्या जागेतील दोडक्‍याने त्याला आधार दिला आहे.

धारगाव (जि. भंडारा) : कोरोनाच्या संकटामुळे देशातील मोठमोठ कारखाने बंद झाले. कारखाना बंद झाल्याने अनेकांचे रोजगा हिरावले गेले. त्यामुळे बेरोजगार झालेला युवक खुर्शीपार या गावाकडे परत आला. काहीच नाही तर, घरची शेती करावी, म्हणून त्याने तयारी केली. यात नवीन प्रयोग म्हणून अर्ध्या एकरात भेंडी व दोडक्‍याचे पीक घेतले.

आता पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असली; तरी, त्याच्या शेतात बहरलेल्या दोडक्‍याच्या पिकामुळे चांगले उत्पन्न मिळण्याची आशा आहे. बेरोजगारीवर मात करीत त्याने आपल्या शेतात दोडक्याची शेती केली.

वडिलोपार्जित शेतातच केले काम

परिसरातील खुर्शीपार (गुंथारा) येथील आयटीआय प्रशिक्षित राजकुमार बबन मस्के हा बुटीबोरी, नागपूर येथे एका कारखान्यात कुशल कामगार म्हणून कार्यरत होता. मार्च महिन्यात कोरोना महामारीच्या संकटामुळे कारखाना बंद पडला. यामुळे तो बेरोजगार झाला. अशा परिस्थितीत कुटुंबासह भाड्याच्या घरात राहणे शक्‍य नसल्याने तो कुटुंबासोबत गावी परत आला. कोरोनाच्या लॉकडाउनमध्ये उन्हाळ्याचे दोन महिने गेले. त्याला गावाकडे दुसरे कामही मिळाले नाही. त्यामुळे वडिलोपार्जित शेतातच काम करण्याचा निश्‍चय करून तो कामाला लागला.

भाज्यांचे उत्पादन सुरू

पारंपरिक पद्धतीने धानाचे पीक घेताना त्याने प्रायोगिक तत्त्वावर अर्धा एकरात दोडक्‍याचे पीक लावले. एक-दोन पावसातच भेंडी व दोडक्‍याच्या वेलींनी शेत हिरवेगार दिसू लागले. आता पावसाने दडी मारल्यामुळे धानाची रोवणी अडली; पण राजकुमारच्या शेतातील भाज्यांचे उत्पादन सुरू झाले आहे. सध्या बाजारात भेंडीला भाव मिळत नसला; तरी छोट्या जागेतील दोडक्‍याने त्याला आधार दिला आहे. आता खुर्शीपार-गुंथारा मार्गावरील त्याचे शेत येणाऱ्या जाणाऱ्यांना आकर्षित करीत आहे.

जाणून घ्या : सिहोऱ्यात वाढला कोरोना आता दर शनिवारी जनता कर्फ्यू !

प्रायोगिक शेतीने दिला आधार
कारखाना बंद पडल्याने गावी परत आलो. इथे दुसरे काम मिळत नसल्याने शेतातच काम केले. प्रयोग म्हणून केलेली दोडके व भेंडीच्या शेतातून ३५ ते ४० हजारांचे उत्पादन होण्याची अपेक्षा आहे.
- राजकुमार मस्के, खुर्शीपार (गुंथारा)

(संपादन - दुलिराम रहांगडाले) भंडारा भंडारा भंडारा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unemployed youth has started a flourishing farm