बापरे! ऐवढी बेरोजगारी!

सुगत खाडे
Friday, 24 January 2020

व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण करूनही नोकरीसाठी वणवण करणाऱ्या तरुणांची संख्या जिल्ह्यात झपाट्याने वाढत आहे. रोजगार मेळाव्यात हजारो तरुण हजेरी लावत असल्याने जिल्ह्यात बेरोजगारीचा ‘पूर’ आल्याचे स्पष्ट होत आहे. नोकरी मिळावी यासाठी बेरोजगार शासकीय कार्यालयातील रिक्त जागांसाठी अर्ज करत आहेत. परंतु जागा कमी व अर्जदारांची संख्या अधिक असल्यामुळे निवडक तरुणांनाच रोजगाराचे साधन उपलब्ध होत आहे.

अकोला ः राज्यातील 72 हजार रिक्त जागांवर महाभरती करण्याची राज्य शासनाने निवडणुकी पूर्वी घोषणा केली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणावर जागा निघणार म्हणून महाराष्ट्रातील तरूण वर्ग उत्साहित होता. परंतु राज्यात सत्तांतर झाल्यानंतर बेरोजगारीच्या यक्ष प्रश्‍नावर बोलण्यायेवजी सत्ताधारी मूंग गिळून बसले आहेत. दूसरीकडे बेरोजगारांची संख्या वाढत असल्याने नोकरीच्या प्रश्‍नाने गंभीर रुप धारण केले आहे.

बेरोजगारीच्या या आगेत जिल्ह्यातील तरुण सुद्धा होरपडल्या जात आहे. रोजगार उपलब्ध नसल्याने जिल्ह्यातील ७८ हजार ७९८ बेरोजगारांनी जानेवारी ते डिसेंबर 2019 या वर्षात शासनाच्या संकेतस्थळावर नोंदणी केली आहे, तर बिगर नोंदणीकृत बेरोजगारांची संख्या लाखावर असल्याचे वास्तव आहे.

व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण करूनही नोकरीसाठी वणवण करणाऱ्या तरुणांची संख्या जिल्ह्यात झपाट्याने वाढत आहे. रोजगार मेळाव्यात हजारो तरुण हजेरी लावत असल्याने जिल्ह्यात बेरोजगारीचा ‘पूर’ आल्याचे स्पष्ट होत आहे. नोकरी मिळावी यासाठी बेरोजगार शासकीय कार्यालयातील रिक्त जागांसाठी अर्ज करत आहेत. परंतु जागा कमी व अर्जदारांची संख्या अधिक असल्यामुळे निवडक तरुणांनाच रोजगाराचे साधन उपलब्ध होत आहे.

रोजगार मिळावा यासाठी तरुण शासनाच्या ‘महास्वयंम्’ संकेतस्थळावर नोंदणी करुन बेरोजगाराचे प्रमाणपत्र प्राप्त करत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात नोंदणीकृत बेरोजगारांची संख्या 78 हजार 798 वर पोहचली आहे. त्यामध्ये सर्वाधित संख्या मुलांची आहे. गेल्या महिन्यात तर एक हजार 129 बेरोजगार तरुणांनी शासनाच्या संकेतस्थळावर नोंदणी केली.

याव्यतिरीक्त अनोंदणीकृत बेरोजगारांची संख्या लाखावर आहे. नोंदणीकृत व अनोंदणीकृत असे लाखो सुशिक्षित बेरोजगार नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. यात पदवीधर आणि पदव्युत्तरसह अभियांत्रिकी, व्यवस्थापन आदी अभ्यासक्रम पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे.

रोजगार निर्मिती घटली; उद्योग नावालाच
जिल्ह्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ (एमआयडीसी) नावालाच आहे. मोठ्या कंपन्या नसल्याने येथील तरुणांना पुणे, मुंबई व इतर मोठ्या शहरात जावून नोकरी करावी लागत आहे. वेतनाचे दर सुद्धा कमी आहेत. कायम रोजगाराची शाश्‍वती नाही व श्रमिकांना कमी वेतनावर काम करावे लागत आहे.

महाभरती रखडली!
बाजारातील आजची स्थिती पाहता सुशिक्षित बेरोजगार सैरभैर झाला आहे. मंदीच्या लाटेत त्याचा कोठेही संधी दिसत नाही. कारखाने धडाधडा बंद होत आहेत. लहान उद्योगांचे सुगीचे दिवस संपल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. विद्यापीठातून मात्र मोठ्या प्रमाणात सुशिक्षित बाहेर पडत आहेत. त्यांची मिळेत ते काम करण्याची इच्छा आणि पात्रताही आहे. परंतु कामच उपलब्ध नाही. त्यामुळे सर्वांच्या नजरा मेगाभरतीकडे वळल्या आहेत. तरुणांना दिलासा देण्यासाठी शासन स्तरावरुन प्रयत्न केले जातील, ही सर्वांना आशा आहे. किमान निवडणुकीपूर्वी केलेल्या घोषणांवर शासन अंमलबजावणी करेल आणि काही विभागात जागा काही विभागात जागा वाढवून आणि ज्या विभागाच्या जाहिरातीच प्रसिद्ध झाल्या नाहीत त्या जागा काढेल, अशी आस सुशिक्षित तरुण लावून बसले आहेत.

नोंदणीकृत बेरोजगारांची माहिती
शिक्षण                              संख्या
दहावी उत्तीर्ण                    25446
बारावी उत्तीर्ण                    27558
इंजिनीअरिंग                      959
डिप्लोमा इन एज्युकेशन      1877
इतर डिप्लोमा                    1778
आयटीआय                       4043
डिप्लोमा अप्रेन्टीस             842
कला पदवीधर/पदवित्तर     7014
विज्ञान                            1792
वाणिज्य                          3119
अभियांत्रिकी                    1641
वैद्यकीय                        84
कृषी                               97
विधी                              86
शिक्षण                           1572
मॅनेजमेंट                        225
इतर पदवीधर/पदवित्तर   665

बेरोजगारांना संधी देण्याचा प्रयत्न
रोजगार मेळावे, महास्वंयम् संकेतस्थळ, रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम आदी माध्यमातून बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. विद्यार्थ्यांना विविध कौशल्य आत्मसात व्हावे, यासाठी केंद्राद्वारे प्रयत्न केले जात आहेत.
- सुधाकर आर. झडके
सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: unemployment increase in akola