डोळसांनाही लाजवणारा प्रवास; दृष्टिहीन युवकाची अनोखी सायकल सफर, दोन हजार किमी १२ दिवसांत पूर्ण करणार

A unique cycle journey of a blind youth read full story
A unique cycle journey of a blind youth read full story

नागपूर : दृष्टिहीन व्यक्तींना आयुष्य जगणे खूप कठीण जाते. त्यात शेकडो किमीचा प्रवास म्हटले की आणखीनच अवघड काम. मात्र, एका पंचविशीतल्या युवकाने सायकलने तब्बल दोन हजार किमी प्रवासाचे शिवधनुष्य उचलून डोळसांनाही लाजविले आहे. त्याच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अजय लालवानी असे या दृष्टिहीन युवकाचे नाव. दृष्टी नसूनही त्याने अनेक अशक्यप्राय मिशन यशस्वीरीत्या पूर्ण करून दिव्यांग कोणत्याच बाबतीत कमी नसल्याचे दाखवून दिले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागात नोकरी करणाऱ्या अजयने ऑक्टोबर २०१८ मध्ये ताश्कंद येथे झालेल्या दृष्टिहीन व मूकबधिरांच्या जागतिक ज्यूदो स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर जून २०१९ मध्ये त्याने हिमालयातील फ्रेन्डशिप पीक व लगेच ऑगस्टमध्ये माऊंट युनुम ही शिखरे पादाक्रांत केली.

गतवर्षी डिसेंबर महिन्यात त्याने मुंबई-गोवा व परत असे बाराशे किमी अंतर सायकलवरून सात दिवसांत पार केले. त्याने सलग दोन वर्षे विभागीय व राज्य जलतरण स्पर्धेतही पदके जिंकली आहेत. दिव्यांगांच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व व मॅरेथॉन शर्यतींमध्ये सहभागी होऊन आपले अष्टपैलूत्व सिद्ध केले. शिवाय मल्लखांबाचाही तो उत्तम खेळाडू आहे.

अजयने आता मुंबई ते गोंदिया व परत हे २०१० किमी अंतर सायकलवरून १२ दिवसांत पार करण्याचा निश्चय केला आहे. त्याच्या या साहसी मोहिमेला गेल्या गुरुवारी (ता. ३) दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणातून सुरुवात झाली. दररोज सुमारे १७० किमी सायकल चालवत तो ९ तारखेला गोंदिया येथे पोहोचला.

गोंदिया येथून तो याच मार्गाने आता परतीच्या प्रवासाला निघाला आहे. येत्या १४ डिसेंबरला सायंकाळी मुंबई येथे समारोप होणार आहे. या मोहिमेत अजयसोबत एकुण दहा सहकारी आहेत. प्रवासादरम्यान अजय व त्याचे सहकारी काही काळ अंबाझरी तलावावर थांबले. यावेळी अंबाझरी जलसरंक्षण व संवर्धन संस्थेचे जलतरण प्रशिक्षक संजय बाटवे, प्रभाकर साठे, शेखर साठे, भोजराज मेश्राम आदींनी टी-शर्ट देऊन सर्वांचे स्वागत केले.

दिव्यांग हे सर्वसामान्यांच्या तुलनेत कोणत्याच बाबतीत कमी नाही
दिव्यांग हे सर्वसामान्यांच्या तुलनेत कोणत्याच बाबतीत कमी नाहीत, हे मला या निमित्ताने दाखवून द्यायचे आहे. शिवाय कोरोनामुळे गेल्या आठ महिन्यांपासून सतत जाणवणारी अव्यक्त भीती, अनिश्चितता व चिंता यावर मात करण्यासाठीही माझी ही साहसी मोहीम होती. 
- अजय लालवाणी, सायकलपटू

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com