esakal | विदर्भाच्या कॅलिफोर्नियात शिरलाय अज्ञात आजार... शेतकऱ्यांचे अर्थकारण धोक्यात 
sakal

बोलून बातमी शोधा

Orange crop

‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ ही बिरुदावली मिळवून जिल्ह्याच्या अर्थकारणात महत्त्वाची भूमिका संत्र्याने निभावली आहे. ‘संत्राबेल्ट’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या वरुड- मोर्शी या परिसरात संत्र्याचे भरघोस उत्पादन होऊन आंबट-गोड चवीची संत्राफळे देशभरात निर्यात केली जातात.

विदर्भाच्या कॅलिफोर्नियात शिरलाय अज्ञात आजार... शेतकऱ्यांचे अर्थकारण धोक्यात 

sakal_logo
By
प्रदीप बहुरुपी

वरुड (जि. अमरावती) ः विदर्भाच्या कॅलिफोर्नियातील संत्रा बागांवर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे आंबिया बहाराच्या संत्राफळांची अवेळी मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने संत्रा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. परिणामी मेहनतीने पिकविलेला संत्रा मातीमोल होत असल्याने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे अर्थकारण धोक्‍यात आले आहे. 

‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ ही बिरुदावली मिळवून जिल्ह्याच्या अर्थकारणात महत्त्वाची भूमिका संत्र्याने निभावली आहे. ‘संत्राबेल्ट’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या वरुड- मोर्शी या परिसरात संत्र्याचे भरघोस उत्पादन होऊन आंबट-गोड चवीची संत्राफळे देशभरात निर्यात केली जातात. आंबिया व मृग बहाराची संत्री शेतकरी घेतात. सध्या आंबिया बहाराची संत्राफळे शेतकऱ्यांच्या बागेत असून त्यावर अज्ञात रोगाने आक्रमण केले आहे. रोगाच्या प्रादुर्भावामुळे झाडावरील हिरव्या संत्राफळांची मोठ्या प्रमाणात गळती होत असून संत्राच्या झाडाखाली पडलेल्या फळांचा खच दिसून येत आहे. 

अवश्य वाचा - अविश्वसनीय! विदर्भातील या गावात चक्क डायनासोर द्यायचे अंडी: काही वर्षांपूर्वी सापडले होते अवशेष 
 

जिवापाड मेहनत व संत्राफुटीसाठी हजारोंचा खर्च शेतकऱ्यांनी केला. मात्र, आता झाडांखाली पडलेली संत्राफळे वेचून फेकून देण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. विशेष म्हणजे काही तालुक्‍यांमध्ये यावर्षी मृगबहार फारच कमी प्रमाणात फुलला. त्यासाठी केलेला खर्चही निघाला नाही. त्यामुळे आंबिया बहराच्या संत्र्यावर शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून होते.

अधिक वाचा - ग्राहकांनो खुशखबर! सोने- चांदीच्या भावात तब्बल इतक्या हजारांची घसरण; खरेदीसाठी ‘अच्छे दिन' 
 

कोरोनामुळे देशभरात संत्र्याला मोठी मागणी पाहता यावर्षी चांगले बाजारभाव मिळतील, या अपेक्षेत शेतकरी असतानाच आता आंबिया बहाराच्या संत्रा फळांवर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने फळगळती होत आहे. त्यामुळे कृषी विभागाने याची दखल घेऊन उपाययोजना सुचवाव्यात, अशी मागणी संत्राउत्पादक शेतकरी करीत आहेत. 

विदर्भात सर्वाधिक संत्रा 

विदर्भात एक लाख २७ हजार हेक्‍टर जमिनीवर संत्रा लागवड केलेली आहे. त्यापैकी अमरावती जिल्ह्यात सुमारे ६५ हजार हेक्‍टरवर संत्राबागा आहेत. वरुड, मोर्शी, चांदूरबाजार, परतवाडा, अचलपूर या तालुक्‍यांमध्ये प्रामुख्याने संत्र्याचे पीक घेतले जाते. 

संपादन ः राजेंद्र मारोटकर 

loading image