esakal | ‘प्रहार’चे तुषार पुंडकर यांचा मृत्यू; रात्री अकोटात झाला होता गोळीबार
sakal

बोलून बातमी शोधा

tushar pundkar

पाठीत गोळी लागल्याने गंभीर जखमी; अकोल्यातील खासगी रुग्णालयात उपचार, हल्लेखोरांचा शोध सुरू, पोलिसांनी केली अकोटात नाकाबंदी

‘प्रहार’चे तुषार पुंडकर यांचा मृत्यू; रात्री अकोटात झाला होता गोळीबार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोट (जि.अकोला) : प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्यावर शुक्रवारी (ता.21) रात्री उशीरा अज्ञातांनी गोळीबार केला. अकोट शहरातील पोलिस वसाहतीमध्ये ही घटना घडली. त्यात तुषार पुंडकर गंभीर जखमी झाले. त्यांना अकोला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, रात्री अकोट शहरात नाकाबंदी करून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला असून, अतिरिक्त पोलिस तुकडी बंदोबस्तासाठी अकोटात तैनात करण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार नाजुकराव पुंडकर यांच्यावर अज्ञात व्यक्तीने अकोट येथे गोळीबार केला. त्यांच्या पाठीमध्ये दोन गोळ्या लागल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. उपस्थित नागरिकांनी त्यांना जखमी अवस्थेत अकोट ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अकोला येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ पाठविण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे अकोट शहरासह जिल्हाभरात खळबळ उडाली. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाचा तपास सुरू होता. हल्लेखोर कोण आहेत, याबाबत पोलिस तपास करीत आहेत. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. हल्ल्याचे कारणही रात्री उशिरापर्यंत कळू शकले नाही. हल्लेखोरांना देशी कट्ट्याचा वापर केला असल्याची प्राथमिक माहिती आहे.

पाठलाग करून गोळ्या झाडल्या
अकोट शहरातील पोलिस वसाहतीजवळ असलेल्या दूध डेअरीजवळ असताना तुषार पुंडकर यांना हल्ल्याबाबत संशय आला. त्यामुळे त्यांनी प्राण वाचविण्यासाठी जीवाच्या आकांताने जवळच असलेल्या पोलिस वसाहतीकडे धाव घेतली. आरोपींनी पाठलाग करून पुंडकर यांच्यावर पाठीमागून गोळीबार केला. त्यात दोन गोळ्या पुंडकर यांच्या पाठीत लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने अकोट ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी 11.30 वाजताच्या सुमारास अकोला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात होते. उपचारादरम्यान, त्यांचा मृत्यू झाला.

पालकमंत्री, आमदार, राजकीय नेत्यांची रुग्णालयात धाव
तुषार पुंडकर यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती मिळाल्यानंतर शिवसेना आमदार नितीन देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी रुग्णालयात धाव घेवून जखमीच्या प्रकृतीची पाहणी केली. मध्यरात्रीनंतर पालकमंत्री बच्चू कडूही रुग्णालयात दाखल झाले. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकरही रात्री रुग्णालयात पोहचले होते. 

रुग्णालयात पोलिसांचा फौजफाटा
तुषार पुंडकर यांना अकोल्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने तेथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. अतिरिक्त पोलिस अधीक्षकसही रुग्णालयात उपस्थित होते. रात्री उशिरा पोलिस अधीक्षकही रुग्णालयात दाखल झाले. प्रहारचे कार्यकर्ते मोठ्यासंख्येने रुग्णालयात उपस्थित होते.