
गुरुवारी (ता.11) पहाटे अडीचच्या सुमारास घडलेल्या या घटनेत वाहन मालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेची तक्रार गोंदिया शहर पोलिसांत करण्यात आली असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी एका युवकाला ताब्यात घेतले आहे.
गोंदिया ः शहरातील श्रीनगर, राधाकृष्ण वॉर्ड व श्रीनगर चंद्रशेखर वॉर्डात घराशेजारी ठेवलेल्या चारचाकी वाहनांसह एक दुचाकी पेटविण्यात आली.
गुरुवारी (ता.11) पहाटे अडीचच्या सुमारास घडलेल्या या घटनेत वाहन मालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेची तक्रार गोंदिया शहर पोलिसांत करण्यात आली असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी एका युवकाला ताब्यात घेतले आहे.
लाच लुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया येथे सहायक फौजदार म्हणून कार्यरत विजय जनार्धन खोब्रागडे हे राधाकृष्ण वॉर्ड, श्रीनगर येथे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. त्यांच्याकडे नऊ लाख 31 हजार रुपये किमतीची कार आहे.
हेही वाचा - Promise बदलले धोक्यात, महागड्या गिफ्टच्या उत्सुकतेपोटी घडला धक्कादायक प्रकार
ही कार नेहमीप्रमाणे त्यांनी घराशेजारील रस्त्याच्या किनाऱ्यावर पार्किंग करून ठेवली होती. पहाटे अडीचच्या सुमारास शेजारच्या लोकांनी कार जळत असल्याने त्यांना आवाज दिला. त्यामुळे त्यांनी झोपेतून उठून पाहिले असता, कार संपूर्ण जळाली होती.
श्रीनगर, मैत्रिय बौद्ध विहाराच्या समोर राहणारे सुधीर भजनदास कोल्हाटकर (वय 38) यांचे मालवाहक वाहनदेखील पेटविण्यात आले. एमएच 35- ए. जे. 0405 क्रमांकाचे मालवाहक वाहन त्यांनी घरासमोर उभे ठेवले होते. या वाहनासह वाहनातील दोन सोफासेट आगीत जळाले. यात त्यांचे 4 लाख 97 हजार 707 रुपयांचे नुकसान झाले. तसेच येथीलच प्रशांत राजेश चौरासिया (वय 31) यांच्या मालकीची कार पेटविण्यात आली. यात त्यांचे 30 हजार रुपयांचे नुकसान झाले.
हेही वाचा - धक्कादायक प्रकार! एक चुकीचा पासवर्ड अन् वर्षभरापासून...
याशिवाय श्रीनगर, चंद्रशेखर वॉर्ड येथील सुमेरसिंग ओमकारसिंग बैस (वय 51) यांच्या मालकीची चारचाकी वाहन जाळून टाकली. यात त्यांचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. या घटनेत एकूण 16 लाख आठ हजार 707 रुपयांची वाहने जाळून नुकसान केले आहेत. या प्रकरणी गोंदिया शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत घटनास्थळ गाठले. पंचनामा केला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एका युवकाला ताब्यात घेतले. या घटनेने वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून अशा युवकांच्या मुसक्या आळवाव्यात, अशी मागणी होत आहे.
संपादन - अथर्व महांकाळ