अरेरे... राज्यातील शेकडो अप्रशिक्षित शिक्षकांनाही सोडावे लागले आपल्या नोकरीवर पाणी!  वाचा कसे...

मनोहर बोरकर 
Saturday, 6 June 2020

दिलेल्या कालावधीत शिक्षक प्रशिक्षित होत नसल्याने त्यांना शासनाने अनेक वेळा मुदतवाढ दिली होती. मात्र वेळोवेळी मुदतवाढ देऊनही अप्रशिक्षित शिक्षक प्रशिक्षित झाले नाही.

एटापल्ली (जि. गडचिरोली) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व वस्ती शाळांमध्ये कार्यरत अप्रशिक्षित शिक्षकांनी विहित मुदतीत आवश्‍यक शैक्षणिक अर्हता (डी.एड.) पूर्ण न केल्याने शासनाने राज्यभरातील अप्रशिक्षित शिक्षकांच्या सेवा समाप्तीचे आदेश काढले आहेत. यामुळे गेली अनेक वर्षे सेवा देणाऱ्या तसेच सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या शिक्षकांना मोठा धक्का बसला आहे. सेवा समाप्त केलेल्यांच्या यादीत राज्यातील शेकडो शिक्षकांसह गडचिरोली जिल्ह्यातील 38 अप्रशिक्षित शिक्षकांचा समावेश आहे. 

राज्यभरातील प्राथमिक शाळा व वस्तीशाळांमध्ये 1985 पासून जिल्हा परिषद शिक्षण विभागांतर्गत शासनाने वेळोवेळी प्राथमिक शिक्षकांची रिक्त पदे भरली होती. त्यावेळी प्रशिक्षित शिक्षक न मिळाल्याने अप्रशिक्षित शिक्षकांची नेमणूक करून विहित मुदतीत शैक्षणिक अर्हता पूर्ण करण्याची सवलत अशा शिक्षकांना देण्यात आली होती. दिलेल्या कालावधीत शिक्षक प्रशिक्षित होत नसल्याने त्यांना शासनाने अनेक वेळा मुदतवाढ दिली होती. मात्र वेळोवेळी मुदतवाढ देऊनही अप्रशिक्षित शिक्षक प्रशिक्षित झाले नाही. त्यामुळे शासनाने 2016 मध्ये निर्णय घेऊन 28 फेब्रुवारी 2019 पर्यंत शिक्षक प्रशिक्षित झाले नाही तर त्यांची सेवा संपुष्टात करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर शासनाने राज्यातील सर्व जिल्हा परिषद प्रशासनांना आदेश पाठवून कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या होत्या. या सूचनांच्या आधारे पंचायत समिती प्रशासनाने आपल्या संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना सेवा समाप्तीचे आदेश पाठवून संबंधित शिक्षकांना यापुढे शाळांवर उपस्थित राहण्याबाबत बंदी घातली आहे. शैक्षणिक सत्र सुरू होण्याअगोदरच अप्रशिक्षित शिक्षकांच्या सेवा समाप्त केल्याने राज्यातील अनेक शाळामध्ये यंदा रिक्त पदांची समस्या भेडसावणार आहे. 

अवश्य वाचा-  हृदयद्रावक घटना! मुलाला वाचवायला गेलेल्या वडिलांचाही तडफडून मृत्यू

कोरोनाच्या संकटात कुटुंब उघड्यावर 

सध्या देशभरात कोरोनाचे संकट आहे. त्यातच उद्योग व अन्य कामधंदे बंद असल्याने सर्वत्र रोजगाराची मोठी समस्या उद्‌भवली आहे. खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्याप्रमाणेच सरकारी कर्मचाऱ्यांना वेतनाअभावी आर्थिक चणचण जाणवत आहे. अशातच अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांना आपल्या नोकरीवर पाणी फेरावे लागल्याने त्यांचे कुटुंबही उघड्यावर आले आहे. यातील अनेकजण सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर होते. मात्र, वारंवार शैक्षणिक पात्रता पूर्ण करण्याची संधी देऊनही ती पूर्ण न केल्याने अप्रशिक्षित शिक्षकांवर बडतर्फ होण्याची नामुष्की ओढवली आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकट काळात त्यांनाही आता कायमचे घरी बसावे लागणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Untrained teacher terminated. No training taken before time.