भाजलेले मासे खाताय ...मासोमारीसाठी होतोय कीटकनाशकांचा वापर

सुरेश नगराळे
Tuesday, 18 February 2020

हल्ली फारशी मेहनत न करता अगदी सोप्या पद्धतीने पैसे कमविण्याचे फंडे वापरले जात आहेत. आता त्यात भर पडली आहे ती राज्यभरातील मासेमारीच्या नवीन पद्धतीची. भाजलेले मासे खाणाऱ्यांनीही आता सावध राहण्याची वेळ आली आहे. कारण पाण्यात कीटकनाशकांचा वापर करून मासेमारी केली जात असल्याने भाजलेले मासे खाणे आरोग्याला धोकादायक आहे.

गडचिरोली : मासेमारीसाठी कीटकनाशकांचा वापर केला जात असल्याचे भोई-ढिवर समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीही याला दुजोरा दिला आहे. राज्यात सुरू असलेल्या या जीवघेण्या व्यवसायाला आळा घालण्याची मागणीही त्यांनी केली आहे. मागील काही वर्षांपासून हा प्रकार सर्वत्र सुरू असल्याने विषयुक्त मासे खाणाऱ्या शौकिनांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे.

पाण्यातील जीवजंतूंची संख्या झपाट्याने कमी होत आहे. यामुळे पाणी शुद्धीकरणाला हातभार लावणारे जीवजंतू नष्ट होत आहेत. यामुळे मासेमारी व्यवसायावर परिणाम झाला आहे.

रात्री पाण्यात टाकले जाते कीटकनाशक

राज्यात मासेमारीतून दररोज लाखो लोकांना रोजगार मिळतो. तलाव, बोडी व नदीच्या पात्रातून मासेमारी केली जाते. नदीपात्रात पाणी वळते करून त्याचे डबके तयार करून "त्या' पाण्यात कीटकनाशक टाकले जाते. ही प्रक्रिया विशेषतः रात्री पार पाडून सकाळी पाण्यावर तरंगलेली मृत मासे बाहेर काढली जाते. त्यानंतर भाजून त्याची बाजारात विक्री केली जात आहे.

माशांच्या प्रजनन प्रक्रियेवर परिणाम

माशांच्या विषप्रयोगासाठी कमी पाण्याचे ठिकाण तसेच साचलेल्या पाण्याचा वापर केला जात आहे. कीटकनाशक औषधांचा वास येऊ नये म्हणून मासे भाजण्याची प्रक्रिया केली जाते. पाण्यातील जीवजंतू खाऊन मासे आपली उपजीविका भागवितात. यामुळे पाणी शुद्ध राहण्यासाठी मोठी मदत होते. याशिवाय विषयुक्त पाण्यामुळे माशांच्या प्रजनन प्रक्रियेवर परिणाम झाल्याने त्यांच्या उत्पन्नातही घट होत आहे. याचा फटका मासेमारांना बसत आहे.

पोलिसांची संबंधितांवर कारवाई

गावपातळीवर रोजगार उपलब्ध व्हावा तसेच शेतीला जोडधंदा म्हणून शासनाकडून मत्स्य व्यवसायाला चालना दिली जात आहे. यामुळे भोई-ढिवर समाजच नाही तर अन्य समाजातील लोकही या व्यवसायाकडे वळले आहेत. मात्र, लालसेपोटी मासेमारीसाठी कीटकनाशकांचा वापर होत असल्याने त्याचे परिणाम या व्यवसायावर होत आहेत.

या प्रकाराला आळा बसावा यासाठी गडचिरोली येथील मच्छिमारांनी पोलिसांत तक्रार केली होती. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करून त्यांचे साहित्य व विषारी मासे जप्त केले होते. मात्र, कारवाईनंतरही कीटकनाशक औषधांतून मासेमारी केली जात आहे.

असे का घडले? : "त्या' नराधमांनी केले असे काही की गतिमंद मुलीचे झाले असे...वाचा...
 

पारंपरिक मच्छिमारबांधवांचा विरोध
मासेमारीसाठी कीटकनाशक औषधांचा वापर होत असल्याच्या तक्रारी संघटनेला प्राप्त झाल्या आहेत. हा प्रकार गेल्या काही वर्षांपासून राज्यात सर्वत्र सुरू आहे. कमी वेळात पैसे कमविण्याच्या लालसेने काही लोकांचे अफलातून काम सुरू आहे. पारंपरिक मच्छिमारबांधवांचा याला विरोध आहे. औषधीद्वारे केलेली मासेमारी आरोग्याला धोकादायक आहे. या प्रकाराला आळा बसणे गरजेचे आहे.
- बाबूराव बावणे, जिल्हाध्यक्ष, भोई-ढिवर समाज संघटना, गडचिरोली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The use of pesticides for fishing at gadchiroli