जन्मापासून रोजगारापर्यंत दृष्टिहीन मुलांसाठी 'तिनं' वेचलं संपूर्ण आयुष्य, बरोजगार महिलांनी दिलं बळ

usha mangalekar teach blind student in chikhaldara of amravati
usha mangalekar teach blind student in chikhaldara of amravati

अमरावती : आठ तासांची नोकरी करून महिन्याच्या पगाराची प्रतीक्षा करण्याच्या चाकोरीबद्ध जीवनापलीकडेसुद्धा काही व्यक्ती असतात, त्यांना समाजाचे काही देणे लागते. ही भावना त्यांच्या मनात रुजलेली असते आणि याच भावनेतून प्रेरित होऊन, अशा व्यक्ती आपल्या दुर्दम्य आशावादातून जगाच्या पलीकडील विश्‍व पाहण्याचा प्रयत्न करतात. असेच एक नाव म्हणजे चिखलदरा येथील उषा राजेश मांगलेकर. नावाप्रमाणेच त्यांनी दृष्टिहीन मुलांचे जीवन उजाळण्याचा प्रयत्न केला आहे. आज खऱ्या अर्थाने उषा मांगलेकर या सावित्रीच्या लेक ठरल्या आहेत.   

सामान्य शिक्षिकेप्रमाणेच उषा मांगलेकर या चिखलदरा येथील निवासी अंध विद्यालयात शिक्षिका म्हणून रूजू झाल्या. मात्र, चाकोरी मोडून त्यांनी आपले जीवन दृष्टीहिनांच्या विकासासाठी सत्करणी लावले. चिखलदरा, धारणी तालुक्‍यातील दुर्गम भागातील आदिवासी बांधवांमध्ये आजही शिक्षणाचे फारसे महत्त्व नाही. त्यातही दृष्टिहीन असलेल्या मुलांना कोण शाळेत पाठविणार?, शिकून तो काय 'साहेब' बनणार का? असे प्रश्‍न सर्वसामान्यांप्रमाणेच आदिवासी बांधवांनाही पडले, तर नवल वाटू नये. मात्र, याच प्रश्‍नांनी उषाताईंना अस्वस्थ केले. दृष्टिहीन मुलांनासुद्धा शिकण्याचा हक्क आहे, त्यांना चांगले जीवन जगण्याचा अधिकार आहे, याच भावनेतून मग त्यांनी आदिवासी भागातील गावांना भेटी देऊन अनेक गावे पिंजून काढली. सामान्यपणे आदिवासी कुटुंबातील लोकांना आजही शिक्षणाचे फारसे महत्त्व नाही. त्यातही दृष्टिहीन अपत्य असल्यास शिकून काय करणार? असा प्रश्‍न त्यांना पडतो. मात्र, उषा मांगलेकर यांनी ही मर्यादा मोडून दृष्टिहीन मुलांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांची मनधरणी करण्यास सुरुवात केली. 

२५ वर्षांच्या त्यांच्या सेवाकाळात आजवर त्यांनी जवळपास ४५ दृष्टिहीन विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न केले. केवळ शिक्षणापुरतेच त्यांनी मर्यादित राहू नये यासह स्वतःच्या पायांवर उभे राहण्यास त्यांना मदत केली. भाजीपाला पिकवून तो बाजारात विकणे, स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देणे, अशा विविध उपक्रमांत त्यांनी विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले. उषा मांगलेकर सांगतात, दृष्टीहीन अपत्य जन्मल्यानंतर तो आठ महिन्यांचा किंवा एक वर्षाचा झाल्यापासून आम्हाला त्यांच्या घराचे उंबरे झिजवावे लागतात. पालकांची मनधरणी करावी लागते, त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून द्यावे लागते. तेव्हा कुठे पाच वर्षांचा झाल्यानंतर त्याचे आईवडील त्यांना शाळेत पाठविण्यास तयार होतात. केवळ शिक्षणच नव्हे तर त्यांच्या घरी जाऊन कपडे देणे, मुलगा शाळेत आला नाही तर घरपोच पुस्तकांची व्यवस्था करणे, अशी अनेक चाकोरीबाह्य कामे उषाताई मागील अनेक वर्षांपासून करीत आहेत. आज खऱ्या अर्थाने उषा मांगलेकर या सावित्रीच्या लेक ठरल्या आहेत.   

महिलांना रोजगार - 
कोरोनाकाळात बेरोजगार झालेल्या महिलांना काहीअंशी रोजगार देण्यासाठी त्यांनी अर्चना सवाई यांच्या सहकार्याने अमरावतीत गृहद्योग सुरू करून काही महिलांना रोजगार देण्याचे कामसुद्धा उषा मांगलेकर यांनी केले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com