esakal | अकोला जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद
sakal

बोलून बातमी शोधा

akola

अत्यावश्‍यक सेवा सुरळीत
काही शाळा बंद तर काही सुरू
तालुका मुख्यालयातही बंदला प्रतिसाद
रस्त्यावर फिरून कार्यकर्त्यांनी केला बंद
बाळापूरसह काही ठिकाणी बळजबरीने दुकाने बंद केल्याने तणाव
मुख्य बाजारपेठ वगळता इतर ठिकाणी दुपारनंतर व्यवहार सुरळीत

अकोला जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : सुधािरत नागरिकत्व कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिक नाेंदणीच्या (एनआरसी) विराेधात वंचित बहुजन आघाडीने शुक्रवार, 24 जानेवारी राेजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंदला विविध संघटननांनी प्रतिसाद दिला. जिल्ह्यात काही किरकोळ घटना वगळता एकूणच बंद शांततेत पार पडला. बंदला अकोला शहरात चांगला प्रतिसाद मिळाला तर जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद होता. दुपारनंतर मुख्य बाजारपेठ वगळता इतर ठिकाणी व्यवहार सुरळीत सुरू झाले.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सुधािरत नागरिकत्व कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिक नाेंदणीच्या (एनआरसी) विराेधात महाराष्ट्र बंदची घाेषणा केली. हा बंद यशस्वी हाेण्यासाठी भारिप-बमंस व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकाऱ्यांनी आठवडाभर जिल्हा पिंजून काढला होता. प्रत्येक तालुक्यात बंदचे नियोजन करण्यात आले होते. वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी गुरुवारी शहरात फिरून सर्व व्यापारी संघटनांना व शाळा-महाविद्यालयांना बंदला सहकार्य करून त्यांची प्रतिष्ठाणे व शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे शुक्रवार सकाळपासूनच अकोला शहरासह जिल्ह्यात बंदचा परिणाम दिसून आला. व्यापारी प्रतिष्ठाणे उघडण्यात आली नाही. वंचित बहुजन आघाडी व भारिप-बमसंचे प्रदीप वानखडे आणि प्रमोद देंडवे यांच्या नेतृत्‍वात जिल्ह्यात बंदचे नियोजन करण्यात आहे. बंद शांततेत राहील यासाठी प्रयत्न करण्यात आले. वंचितचे पदाधिकारी बाजारपेठेत फिरून प्रतिष्ठाणे बंद करण्याचे आवाहन करताना दिसले. त्यातून अकोला शहरासह काही ठिकाणी वादाचे प्रसंगही घडले. मात्र ‘वंचित’च्या पदाधिकाऱ्यांसह पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत हे वाद मिटविल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.


एसटीची वाहतूक सुरळीत
वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शुक्रवारी (ता.२४) सीएला विरोध दर्शवित महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंद काळात अत्यावश्‍यक सेवा म्हणून एसटीला वगळ्यात आले. त्यामुळे एसटीची वाहतूक सुरळीत सुरू होती. त्यानंतरही एसटी महामंडळाने कोणताही धोका न पत्करताना जिल्ह्यातील काही मार्गावरील बस सेवा बंद ठेवल्याचे दिसून आले. तसेच लांब पल्ल्याच्या गाड्याही सोडण्यात आल्या नाहीत. दुपारनंतर मात्र बस सेवा सुरळित झाली.


रुग्णालये, औषध दुकाने सुरू
अत्यावश्‍यक सेवा म्हणून रुग्णालये, औषध प्रतिष्ठाणे बंद मधून वगळ्यात आली होती. त्यामुळे शहरातील बहुतांश ठिकाणी औषधांची दुकाने सुरू होती. दवाखाने आणि पॅथॉलिजीही सुरू होते. परिणामी नागरिकांना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागला नाही.


काही शाळांना सुटी, काही सुरू!
बंदमुळे अकोला शहरासह जिल्ह्यातील काही शाळांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. अकोला शहरातील काही शाळा मात्र त्यांच्या निर्धारित वेळेपर्यंत सुरू होत्या. यात होलीक्रॉस कॉन्व्हेंट, बालशिवाजी शाळा, कार्मेल कॉन्व्हेंट, खंडेलवाल ज्ञानमंदिर आदी शाळा सुरू होत्या.

loading image