गडगडले भाजीपाल्याचे भाव, भाजीबाजारावरही 'मंदी'चा कोरोना

vegetables.
vegetables.

पुसद (जि. यवतमाळ) : मुबलक पाणी, सिंचनाची सुविधा, मेहनतीची जोड मिळाल्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांची भाजीपाला पिकांकडे जास्त ओढ आहे. पुसद शिवारातील शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवडीत आघाडी घेतली आहे. भरमसाठ उत्पादनामुळे बाजारपेठेत भाजीपाल्याचे भाव गडगडले असून, शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. भाजीपाल्यातही 'मंदी'चा कोरोना शिरल्याने शेतकरी पुन्हा हवालदिल झाले आहेत.

जिल्ह्यातील अनेक भागासह पुसद शिवारात शेकडो एकर भाजीपाल्याचे पीक घेण्यात येते. अल्पभूधारक शेतकरी मेहनत करून टोमॅटो, मिरची, कोबी, पालक, सांभार, मेथी, बरबटी आदींचे भरघोस उत्पादन काढतात. भाजीपाला पिकावर त्यांचा चरितार्थ चालतो. परंतु, पुसद मंडईत भाजीपाल्याचे भाव चांगलेच कोसळल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.

मंडईत भाजीपाल्याची वाढलेली आवक व कमी झालेल्या उठावामुळे भाजीपाल्याचे भाव चांगलेच गडगडले आहेत. बुधवारी (ता.11) पुसद मंडईला भेट दिली असता, आवारात कोबीचे ढीग खरेदीविना पडून होते. तीच परिस्थिती टोमॅटोची होती. हिमोग्लोबिन वाढविणाऱ्या बिटला मागणी नव्हती. पुसद मंडईत सावरगाव जिरे येथील गणपत हिराजी हरिमकर या शेतकऱ्याने दहा क्विंटल कोबी विक्रीसाठी आणली. मात्र, त्याच्या कोबीला केवळ प्रतिकिलो दोन रुपयेच भाव मिळाला. त्यामुळे खर्चावजा जाता त्याला चार हजार रुपये तोटा आला आहे. लागवडीचा खर्च तर सोडाच विक्रीसाठी आणण्याचा खर्चही निघाला नाही. बुधवारी एकूण 100 क्विंटल कोबी विक्रीसाठी मंडईत आली होती. पांढऱ्या शुभ्र व दर्जेदार कोबीकडे पाहताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. याच कोबीने पावसाळी ऋतूत 50 रुपये किलोपर्यंत मजल मारलेली होती. त्यावेळी काही शेतकरी अगदी मालामाल झाले. आता, मात्र कोबीने शेतकरी कंगाल बनले आहेत. हीच स्थिती टोमॅटो पिकाची आहे. 'सरप्लस' उत्पादनामुळे टोमॅटोचे भाव घसरले आहेत.

शेतकरी  कंटाळले

भाजी मंडईत शेतकऱ्याच्या टोमॅटोला प्रतिकिलो तीन रुपये भाव मिळत आहेत. उत्पादनखर्च तर सोडाच विक्री व्यवस्थेला लागलेला खर्चही निघत नसल्याने टोमॅटो, कोबी पिकात नांगर घालावा की काय, अशी स्थिती उत्पन्न झाल्याचे शेतकरी सांगतात. पुसद मंडईत मिरचीचे भाव 10 रुपये किलो आहेत. सांबर, मेथी, पालक या भाजीपाल्याला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बळकट होण्याऐवजी त्याची पदरमोड होत आहे. 'सरप्लस' उत्पादनामुळे भाजीपाल्यावर अवकळा आली आहे, शेतकरी अक्षरश: कंटाळले आहेत, असे विक्री एजंट अफसरभाई यांनी सांगितले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com