esakal | घराघरातून दरवळतोय आरोग्यदायी रानभाज्यांचा खमंग सुवास, महिलावर्गातून वाढतेय मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

bhandara

पहिला दुसरा पाऊस पडला की शेतशिवारात, ओसाड रानमाळात, डोंगराळ भागात विविध प्रकारच्या रानभाज्या उगवतात. या रानभाज्यांना विशिष्ट चव असून आरोग्याच्या दृष्टीने अनेक पौष्टिक घटक व जीवनसत्त्वे आढळतात.

घराघरातून दरवळतोय आरोग्यदायी रानभाज्यांचा खमंग सुवास, महिलावर्गातून वाढतेय मागणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पालांदूर ( जि. भंडारा ) : कुटुंबाच्या आरोग्याची काळजी सगळ्यात जास्त घरातील गृहिणीला असते. आणि सध्याच्या कोरानाच्या परिस्थितीत धास्तावलेल्या गृहिणी कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची विशेषच काळजी घेताहेत.परिणामी पावसाळ्याच्या सुरुवातीला रानावनात आढळणाऱ्या प्रतिकारशक्‍ती वाढविणाऱ्या रानभाज्यांना महिलांची विशेष मागणी आहे.
पहिला दुसरा पाऊस पडला की शेतशिवारात, ओसाड रानमाळात, डोंगराळ भागात विविध प्रकारच्या रानभाज्या उगवतात. या रानभाज्यांना विशिष्ट चव असून आरोग्याच्या दृष्टीने अनेक पौष्टिक घटक व जीवनसत्त्वे आढळतात. सध्या सर्वत्र कोरोनाचे सावट आहे. या पार्श्‍वभूमीवर (इम्युनिटी) रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी या भाज्यांची मागणी वाढली आहे.
रानभाज्यांना आयुर्वेदात महत्त्वाचे स्थान आहे. पावसाळ्यानंतर आपसूकच उगवणाऱ्या या भाज्या फक्त सुरुवातीच्या काळात दिसून येतात. भाज्या गोळा करून आणण्याची परंपरा चालविणारे लोक ग्रामीण भागात आहेत. भाजीचे विविध प्रकार त्यांना ओळखता येतात. भाज्या गोळा करून आणण्याचे काम अत्यंत मेहनतीचे आहे. श्रमाच्या तुलनेत पुरेसा मोबदला मिळत नसला तरी केवळ हंगामी व्यवसाय म्हणून रानभाज्या गोळा करून विकण्याचे काम केले जाते.
रानभाज्यांची मागणी करणारा, चवीने खाणारासुद्धा विशिष्ट वर्ग आहे. मधुमेह, रक्तदाब, ह्वदयरोग, वातविकार अशा विविध रोगांवर रानभाज्या गुणकारी आहेत. रानभाज्यांच्या गुणधर्मामुळे रोगप्रतिकारक क्षमता, ऊर्जा वाढत असल्याचे आयुर्वेदात सांगितले आहे. अलीकडे प्रसारमाध्यमातूनसुद्धा अनेक वैद्यकीय तज्ज्ञांनीसुद्धा रानभाज्या व पारंपरिक अन्नपदार्थांमधून कोरोनाविरुद्ध लढण्याची क्षमता वाढत असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे कधी नव्हे ते अनेकांच्या घरात रानभाज्यांचा खमंग सुवास दरवळत आहे. पावसाळ्यात रानावनात मिळणाऱ्या तरोटा, पातूर, माठभाजी, केना, शेरडेरे, अंबाडी, कुड्याची, हेटीची फुले, बहावा फुले, अरतफरी, खापरखुटी या भाज्यांचा आहारात वापर केल्यास वातरोग, त्वचारोग ,नेत्ररोग, खोकला, कफ होत नसल्याचे आयुर्वेदात सांगितले आहे.
नैसर्गिकरीत्या उगवण
पहिला पाऊस पडला की या भाज्या नैसर्गिकरीत्या उगवतात. अलीकडे फळे, भाज्या पिकविण्यासाठी खते, कीटकनाशक यांचा बेसुमार वापर वाढला आहे. त्यामुळे शेतात पिकविलेल्या भाज्यांमधील पौष्टिक घटक संपुष्टात येतात. शिवाय आरोग्यासाठी पाहिजे तसा लाभ होत नाही. तुलनेत रानभाज्या या कित्येक पट उपयुक्त आहेत. दिवसेंदिवस कमी होणारे जंगल, नैसर्गिक अधिवासावर होणारे अतिक्रमण यामुळे बऱ्याच रानभाज्या लुप्त होत आहेत. तथापि कोरोना प्रादुर्भावामुळे अनेक लोक नैसर्गिक व सेंद्रीय पद्धतीने पिकविल्या जाणाऱ्या भाज्यांना पसंती देत आहेत.

सविस्तर वाचा - खाकी वर्दीतील लव्हबर्डची चर्चा जोरात, वरिष्ठांपर्यंत पोहोचले प्रकरण अन...
भाज्या आणण्याचे काम कष्टाचे
रानावनातून, माळरानातून भाज्या शोधून गोळा करून आणणे हे जिकरीचे आणि श्रमाचे काम आहे. भल्या पहाटे उठून ग्रामीण भागातील महिला टोपली विळे घेऊन बाहेर पडतात. बऱ्याचवेळा भाज्या गोळ्या करताना विषारी कीटकांच्या दंशाची भीती असते. या समूहाने गेलेल्यांमधील वयस्क महिलांना भाज्यांची चांगली ओळख असते. त्यांच्या सांगण्यानुसार भाज्या खुडून आणल्या जातात. घरी आणून स्वच्छ केल्यानंतर बाजारात व गावांत घरोघरी फिरुन त्यांची विक्री केली जाते. तेव्हा कुठे चारपैसे पदरी पडतात.