कुलगुरू डॉ.विलास भाले यांना ‘हरितरत्न’ 

अनुप ताले
गुरुवार, 23 जानेवारी 2020

कृषी शिक्षण, संशोधन तथा प्रशासकीक कार्यातील गत 15 वर्षातील उल्लेखनीय कार्यासाठी, विशेषतः युवा वर्गाचे सबलीकरणासाठी केलेल्या अत्यूच्च कामगिरीबद्दल, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विलास भाले यांना ‘हरितरत्न 2019’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

अकोला : कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी अखिल भारतीय स्तरावरील प्रतिष्ठीत ‘हरितरत्न - 2019’ हा पुरस्कार, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विलास भाले यांना 20 जानेवारी रोजी प्रदान करण्यात आला.

आखिल भारतीय कृषी विद्यार्थी संघटना, नवी दिल्लीद्वारे सन 2019 च्या ‘हरितरत्न’ पुरस्कारासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांची निवड करण्यात आली. कृषी शिक्षण, संशोधन तथा प्रशासकीक कार्यातील गत 15 वर्षातील उल्लेखनीय कार्यासाठी, विशेषतः युवा वर्गाचे सबलीकरणासाठी केलेल्या अत्यूच्च कामगिरीबद्दल, देशभरातील सर्व कुलगुरू व इतर कृषी पदवीधरांमधून डॉ.भाले यांची निवड राष्ट्रीय समितीने केली आहे. इंदिरा गांधी कृषी विश्वविद्यालय रायपूर, आखिल भारतीय कृषी विद्यार्थी संघटना, नवी दिल्ली आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांचे संयुक्तपणे, कृषी महाविद्यालय रायपूर येथे, 20 जानेवारी रोजी ‘भावी पिढीसाठी नाविन्यपूर्ण कृषी उपक्रम-कृषी आणि तत्सम क्षेत्रांतील शाश्वत मनुष्यबळ निर्मितीमधील संधी आणि आवाहने’ या विषयावर 5 व्या राष्ट्रीय युवा परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कुलगुरू डॉ. विलास भाले यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

यांचे हस्ते व उपस्थितीत गौरव
भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्लीचे उपमहानिदेशक डॉ.आर.सी. अग्रवाल यांचे हस्ते कुलगुरू डॉ.विलास भाले यांना ‘हरितरत्न’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी इंदिरा गांधी कृषी विश्वविद्यालय रायपुरचे कुलगुरू डॉ.कर्नल.एस.के. पाटील, राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण बँकेचे व्यावसायिक महाव्यवस्थापक एम. सोरेन, अखिल भारतीय विद्यापीठ संघटनेचे सचिव डॉ.आर.पी. सिंग, आसाम कृषी विश्वविद्यालय जोरहटचे माजी कुलगुरू डॉ.व्ही.एस. बघेल, अखिल भारतीय विद्यापीठ संघटनेचे भूतपूर्व अध्यक्ष डॉ.एन.सी. पटेल यांचे सह आखिल भारतीय कृषी विद्यार्थी संघटना नवी दिल्लीचे सचिव डॉ. सहदेव सिंग यांची प्रमुख उपस्थिती होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vice-Chancellor Dr. Vilas Bhale Awarded by Haritaratna