esakal | Chandrapur: आदिवासी संस्कृतीचे अवशेष नष्ट होण्याच्या मार्गावर
sakal

बोलून बातमी शोधा

आदिवासी संस्कृतीचे अवशेष नष्ट होण्याच्या मार्गावर

चंद्रपूर : आदिवासी संस्कृतीचे अवशेष नष्ट होण्याच्या मार्गावर

sakal_logo
By
पराग भानारकर

नागभीड (जि. चंद्रपूर) : नागभीड शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. मात्र, स्थानिक प्रशासनाच्या उदासिनतेमुळे हा ऐतिहासिक ठेवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. येथील प्रसिद्ध असलेल्या शिवटेकडीच्या पायथ्याशी ओबडधोबड शिळा उभ्या आहेत. त्याकडे फारसे कोणाचे लक्ष नाही किंवा तशी त्याबद्दल अधिकची माहिती जाणून घेण्याची कुणी चिकित्सक भूमिकाही घेतली नाही.

१९९०-९५ च्या काळात येथील बसस्थानक हे शिवटेकडीकडे होते. त्या भागात तेव्हा नागरिकांची वर्दळ होती. महाशिवरात्रीला यात्रेच्या निमित्ताने या भागात लोकांची ये-जा सुरू असायची. डॉ. रघुनाथ बोरकर हे या भागात फिरत असताना त्यांना शिळा दिसल्या. ब्रिटिश रेकॉर्डमध्ये जरी याची नोंद असली तरी, सर्वप्रथम या शिळांबद्दल ऐतिहासिक माहिती वर्तमानपत्रातून त्यांनी जगाला दिली. त्यानंतर अशाच दगडी शिळांचा शोध नागभीडजवळील डोंगरगाव, कसरला, कोरंबी व नवखळा या भागांत इतिहास संशोधक अमित भगत यांनी लावला.

हेही वाचा: खटाव : पावसाने पिकांची हानी; झेंडू बागांचे अतोनात नुकसान

काही संशोधकांनी या भागात येऊन या शिळा स्मारकांचा अभ्यास केला. त्यावर पीएचडी केली. या शिळा आजपासून हजारो वर्षांआधी या भागांत राहत असलेल्या आपल्या पूर्वजांनी आणि आदिवासी समुहाच्या लोकांनी त्यांच्या समूहातल्या मृतांसाठी त्यांना दफन करून उभे केलेले स्मारक आहेत. ओबडधोबड दिसत असलेल्या शिळा या हरवलेल्या संस्कृतीचे भक्कम पुरावे आहेत. वैज्ञानिक भाषेत या शिळा ‘बृहदाश्म’चा एक प्रकार आहे. त्यांना ‘शिलास्मारके’ म्हणतात. काही ठिकाणी या स्मारकाजवळ उत्खनन करण्यात आले आहे.

तिथे त्या काळातील शस्त्र, कंबरेचे आणि गळ्यातले दगडी मणी, दागिणे, प्राण्यांचे अवशेष, भांडी इत्यादा सापडली आहेत. हे स्मारक लोखंडाचा शोध लागत असताना तयार केले आहे. काही ठिकाणी लोखंडाचे शस्त्रसुद्धा सापडतात. नागभीड हे गाव तीन हजार वर्षांपासून इथेच वसलेले आहे. याची साक्ष हे दगडी स्मारक देतात. आजच्या घडीला आदिवासी बहुसंख्य असलेले हे गाव आज सर्वधर्मीय झालेले आहे.

हेही वाचा: विदर्भात पाच लाख हेक्टरवरील पीक अडचणीत

आज या टेकडीच्या भागाचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला आहे. येथे मोठी वस्तीही निर्माण झाली आहे. मंदिराला पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाला आहे. महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते. असे असले तरी या भागांत असलेल्या हजारो वर्षे जुन्या मौल्यवान शिला स्मारकाकडे कोणाचेही लक्ष नाही. शहरीकरणाच्या ओघात हे हजारो वर्षे जुने स्मारक शेवटच्या घटका मोजत आहे. या भागांत वाढलेल्या वस्तीने आणि सरकारी कार्यालयाच्या गर्दीने कितीतरी मौल्यवान स्मारके नष्ट झाली. आज घडीला या टेकडीच्या पायथ्याशी १२ स्मारके आहेत.

अशा प्रकारची स्मारके इंग्लंड व फ्रांसमध्येही आढळतात. तेथील शासनाने त्यांचे योग्य प्रकारे जतन केले आहे. त्यांच्याभोवती संरक्षण भिंत व उद्याने निर्माण केली. तिथे पर्यटन निर्मिती केली आहे. मात्र आपल्याकडे या प्राचीन ठेव्याकडे दुर्लक्ष होत आहे. नागभीड येथील या स्मारकाचे जतन होण्यासाठी सामाजिक संघटना, विद्यार्थी, सरकारी संस्था व स्थानिक प्रशासनाने एकत्र येऊन, या वास्तूचे जतन करण्याची गरज आहे.

loading image
go to top