esakal | Vidarbh: शेतकऱ्यांना घरपोच मिळणार सातबारा
sakal

बोलून बातमी शोधा

सातबारा मिळणार मोफत

अमरावती : शेतकऱ्यांना घरपोच मिळणार सातबारा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

तिवसा (जि. अमरावती) : देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्य शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विनामूल्य व घरोघरी जाऊन वितरित करण्यात येत आहे. प्रत्येक शेतकऱ्याला संगणकीकृत सातबारा विनामूल्य व घरपोच मिळणार असल्याची माहिती महसूल विभागाने दिली. त्यामुळे आता शेतकऱ्यांना तहसील कार्यालयाच्या चकरा माराव्या लागणार नाहीत.

महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग, जमाबंदी आयुक्त, भूमी अभिलेख यांच्या संयुक्त विद्यमाने दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीदिनी भारतीय स्वतंत्र अमृत महोत्सवानिमित्त डिजिटल स्वाक्षरी मोफत गाव नमुना ७/१२ घरपोच वाटपाच्या मोहिमेची सुरुवात जिल्ह्यात करण्यात आली. मंडळनिहाय सर्व गावांमध्ये मोफत संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरीतील सातबारे शेतकऱ्यांना देण्यात आले.

हेही वाचा: यवतमाळ : जिल्ह्यातील एटीएम चोरट्यांच्या निशाण्यावर

तिवसा तालुक्यात ७/१२ मोफत मोहीम सुरू करीत असताना कुऱ्हा येथे पं. स. सदस्य सत्तार मुल्ला, पंचायत समिती उपसभापती शरद वानखडे, वरखेड येथे जिल्हापरिषद सदस्य अभिजित बोके, पं. स. सदस्य रोशनी पुनसे, नीलेश खुळे, सरपंच मुकुंद पुनसे व भारवाडी याठिकाणी तहसीलदार वैभव फरतारे यांच्या उपस्थितीत मोफत ७/१२ वाटप मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

सर्व शेतकऱ्यांनी आपल्या ७/१२ चे अवलोकन करून, त्यामध्ये काही त्रुटी आढळून आल्यास त्याबाबतची माहिती सोबत जोडलेल्या फीडबॅक अर्जासोबत भरून संबंधित तलाठी यांच्याकडे द्यावी. त्यामुळे सर्व खातेदार शेतकरी यांचा अधिकार अभिलेख होण्यास या मोहिमेची मदत होणार आहे. सदर मोहीम यशस्वी करण्यासाठी पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर, जिल्हाधिकारी पवनीत कौर, उपविभागीय अधिकारी नितीन व्यवहारे यांच्या मार्गदर्शनात तहसीलदार वैभव फरतारे, नायब तहसीलदार डी. टी. पंधरे, नायब तहसीलदार अशोक काळीवकर, नायब तहसीलदार अजिनाथ गंजारे, सर्व मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल, तिवसा महसूल विभागातील कर्मचारी यांच्या नियंत्रणात सुरुवात करण्यात आली.

डिजिटल स्वाक्षरी मोफत गाव नमुना ७/१२ मोहीम महसूल विभागातील सर्व शेतकऱ्यांकरिता असून, याचा लाभ जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी घ्यावा तसेच ही मोहीम सर्व शेतकऱ्यांना मोफत ७/१२ प्राप्त होईपर्यंत सुरू राहील.

-वैभव फरतारे, तहसीलदार, तिवसा

loading image
go to top