esakal | Yavatmal: जिल्ह्यातील एटीएम चोरट्यांच्या निशाण्यावर
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यातील एटीएम चोरट्यांच्या निशाण्यावर

यवतमाळ : जिल्ह्यातील एटीएम चोरट्यांच्या निशाण्यावर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : ग्राहकांची बँकेत होणारी गर्दी कमी करण्यासाठी शहरीच नव्हे तर ग्रामीण भागापर्यंत विविध बँकांनी एटीएम मशीनचे नेटवर्क उभे केले आहे. मात्र, आता हेच एटीएम चोरट्यांच्या निशाण्यावर आले आहेत. एकाच आठवड्यात राळेगाव तालुक्यात दोन एटीएम फोडण्याच्या घटना उघडकीस आल्या. तर, यवतमाळ शहरात एटीएम मशीनमध्ये क्लोनिंग स्कॅनर बसवून ग्राहकांच्या खात्यातून पैसे उडविण्यात आले.

एटीएम मशीन येण्यापूर्वी ग्राहकांना थेट बँकेत गेल्यानंतर रांगेत उभे रहावे लागत होते. यात ग्राहकांचा आणि बँक कर्मचाऱ्‍यांचा वेळ जात होता. एटीएम मशीन आल्याने ग्राहकांसाठी सुविधा उपलब्ध झाली. एटीएम कार्डद्वारे ग्राहकांना कधीही, कुठेही पैसे काढता येतात. जिल्ह्यात विविध बँकांचे साडेतीनशे पेक्षा जास्त एटीएम मशीन आहे. सायबर चोरट्यांनी एटीएम मशीनमध्ये क्लोनिंग स्कॅनर करून पैसे उडविण्याचा फंडाही शोधून काढला.

हेही वाचा: अमरावती : परतीचा पाऊस शेतकऱ्यांच्या मुळावर

एटीएममध्ये ग्राहक पैसे काढण्यासाठी गेल्यावर मशीनमध्ये बसविलेल्या यंत्राद्वारे कार्डचे क्लोनिंग केले जाते. फ्रॉडर हातोहात एका ठिकाणाहून पैसे उडवितात. यवतमाळ शहरात जवळपास तीन एटीएममधून पंधरा ग्राहकांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. सायबर सेल या प्रकरणाचा तपास करीत असतानाच राळेगावातही एटीएम मशीन कटरच्या सहाय्याने फोडून साडेआठ लाख रुपयांची रोकड उडविण्यात आली.

अडीच ते तीन वर्षांपूर्वी पांढरकवडा तालुक्यात एटीएम मशीन फोडून २५ लाखांपेक्षा अधिक रोकड उडविण्यात आली होती. पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत या घटनेचा उलगडा केला होता. त्यानंतर दारव्हा येथेही एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न झाला होता. राळेगाव येथे चोरट्यांना रोकड उडविण्यात यश आले. चोरट्यांची टोळी परराज्यातील असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्या दिशेने त्यांचा तपास सुरू आहे.

हेही वाचा: मालवण : परप्रांतीय पर्ससीन ट्रॉलर्सची पुन्हा घुसखोरी

वारंवार अशा घटना घडत असताना एटीएम मशीनच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षकांनाही तैनात करण्यात आले नाही. बँक प्रशासन केवळ सीसीटीव्ही कॅमेऱ्‍यावरच विश्‍वास दाखवत आहे. आगामी काळात एटीएमच्या सुरक्षेसाठी कडक पाऊल उचलणे गरजेचे झाले आहे.

loading image
go to top