महापौर संदीप जोशी म्हणतात, जनतेच्या अपेक्षा, समस्यांची श्‍वेतपत्रिका काढणार

vidarbh nagpur corporator sandip joshi people expectation
vidarbh nagpur corporator sandip joshi people expectation

नागपूर ः सध्या नागपूरकरांच्या समस्या आणि अपेक्षा जाणून घेतल्या जात आहेत. त्या एकत्रित झाल्यानंतर त्याची श्‍वेतपत्रिका काढली जाईल. त्यानंतर त्याची पूर्तता करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात येणार आहे. आपल्याकडे फक्त सव्वावर्षाचा कालावधी आहे. त्यामुळे टी-20 प्रमाणेच सामना खेळावा लागणार असून धुवाधार बॅटिंग करण्याचा मानस शहराचे नवनिर्वाचित महापौर संदीप जोशी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

महापौर झाल्यानंतर जोशी यांनी स्वागत समारंभ व हारतुरे न स्वीकारता थेट कामकाजाला सुरुवात केली आहे. अवघ्या दहा दिवसांच्या आत त्यांनी महापालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या तसेच सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या समस्या विविध उद्यानांमध्ये फिरून तसेच एनजीओसोबत ब्रेकफास्ट घेऊन जाणून घेतल्या आहेत. याकरिता अनुभवी व ज्येष्ठ नगरसेवकांची समिती स्थापन केली. अधिकाऱ्यांना विश्‍वासात घेतले. सर्वांची माहिती एकत्रित करून श्‍वेतपत्रिका काढली जाणार आहे. जमेल तेवढ्या समस्या सोडवून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाईल. अतिक्रमण, मोकाट कुत्रे, रस्त्यावर फिरणारे जनावरे, गोठे, स्वच्छता, महापालिकेची रुग्णालये, दवाखाने व शाळा याच समस्या प्राधान्याने सोडवण्यात याव्या असा भर बैठका व चर्चांमधून सर्वसामान्यांचा होता, असे जोशी यांनी सांगितले. हे सर्व करीत असताना सर्वसामान्यांवर कुठलीही करवाढ लादणार नसल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.


अतिक्रमण खपवून घेणार नाही

अतिक्रमणासंदर्भात सर्वपक्षीय समिती स्थापन केली आहे. आजच समितीचा अहवाल आपल्याला प्राप्त झाला. सात डिसेंबरला विशेष सभा बोलावण्यात आली आहे. यात नगरसेवकांच्याही सूचना जाणून घेण्यात येईल. या कामात भेदभाव व राजकारण न आणता शहराला अतिक्रमणमुक्त करण्यास सहकार्याची विनंती केली जाईल. बरेचदा लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप व दबावामुळेसुद्धा अतिक्रमणाला अभय दिले जाते, याकडेही महापौरांनी लक्ष वेधले.


डंपिंग यार्डची समस्या संपली

भांडेवाडी येथील डंपिंग यार्डच्या 35 एकर जागेवर कचऱ्याचे डोंगर उभे आहेत. तेथे बायोमायनिंग प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. हा राज्यातील पहिलाच प्रकल्प आहे. आतापर्यंत तीन एकर जागा रिकामी करण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यात एकूण आठ एकर जागा मोकळी होईल. तसेच शहरात पाच कचरा संकलन केंद्रे सुरू केली जाणार आहेत. ज्या भागातील कचरा त्याचा भागात गोळा केला जाईल व प्रक्रिया केली जाणार आहे.
 

मोकाट कुत्री भीषण समस्या

तीन वर्षांपूर्वीच्या आकडेवारीनुसार सध्या शहरात 75 हजार मोकाट कुत्री आहेत. पाच वर्षांत त्यांची संख्या पाच लाखांच्या घरात जाणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे भविष्यात भीषण समस्या म्हणून ती समोर येणार आहे. त्यावर आत्तापासूनच नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. त्यात कुत्र्यांना पकडण्यापासून तर नसबंदीचा कार्यक्रम हाती घेतला जाईल.


महापौर निधी स्वच्छतागृहांसाठी

सध्याची सार्वजनिक प्रसाधनगृहे अत्यंत घाणेरडी आहेत. त्यात जाणेही अवघड असते. याकरिता सफाई कर्मचाऱ्यावर त्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याच्या नावाची पाटीच त्यावर लावली जाईल. ते अस्वच्छ आढळल्यास थेट कारवाई करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. याशिवाय आपला संपूर्ण महापौर निधी स्वच्छतागृह उभारण्यासाठी खर्च केला जाणार आहे. शहरातील पेट्रोल पंपांनाही त्यांचे शौचालय सर्वांसाठी खुले करण्याची विनंती केली जाईल. 73 बायो टॉयलेट, शंभर सुलभ शौचालय उभारण्यात येणार असून नागरिकांच्या समस्या दूर केल्या जातील.


अनुदानाची चिंता नाही

विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा सक्षम विरोधीपक्षनेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आहे. राज्यात सत्तापालट झाले असले तरी महापालिकेला अनुदानासाठी काळजी करण्याची चिंता नाही. माजी मुख्यमंत्र्यांनी महापालिकेचा जीएसटी 56 कोटींवरून 96 कोटींवर नेला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com