विदर्भ मुलांचा संघ करणार आणखी एक विक्रम

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 11 February 2020

विदर्भाने बडोद्याला पराभूत केल्यास रणजी संघानंतर बीसीसीआयच्या अखिल भारतीय स्पर्धेत दुसऱ्यांदा विजेतेपद पटकाविणारा दुसरा संघ ठरणार आहे. हा या संघाचा नवीन विक्रम ठरेल. विदर्भाने दोन वर्षांपूर्वी (2017-18 मध्ये) घरच्या मैदानावर मध्य प्रदेशला नमवून प्रथमच विजेतेपद पटकाविले होते.

नागपूर : कुचबिहार करंडक स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी अंतिम फेरीत प्रवेश करून विदर्भ मुलांच्या 19 वर्षांखालील संघाने यापूर्वीच एका विक्रमाची नोंद आपल्या नावे केली आहे. हे मुले आणखी एक विक्रम करण्याच्या तयारीत आहे. कुचबिहार करंडक विजेतेपदासाठी यजमान विदर्भ आणि बडोदा संघादरम्यान उद्यापासून (ता. 12) विदर्भ क्रिकेट संघटनेच्या सिव्हिल लाइन्स मैदानावर चारदिवसीय अंतिम सामना रंगणार आहे. यानंतर या विक्रमाची नोंद होऊ शकते. एकूण परिस्थितीचा विचार करता या सामन्यात विदर्भाचे पारडे निश्‍चितच जड राहणार आहे, त्यामुळे हा विक्रम नक्की होईल, अशी आशा विदर्भातील क्रिकेटप्रेमींना आहे.

अमन मोखाडेच्या नेतृत्वात विदर्भाने साखळी फेरीत 35 गुण मिळवून थाटात बादफेरी गाठली होती. त्यानंतर उपांत्यपूर्वफेरीत चंडीगड व उपांत्य लढतीत मुंबईचे आव्हान सहज मोडीत काढून सलग तिसऱ्या वर्षी अंतिम फेरीत धडक मारली. व्हीसीएच्या आतापर्यंतच्या 60 वर्षांच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले. विदर्भाच्या कोणत्याही वयोगटातील संघाने अशी कामगिरी केलेली नाही. विदर्भाने बडोद्याला पराभूत केल्यास रणजी संघानंतर बीसीसीआयच्या अखिल भारतीय स्पर्धेत दुसऱ्यांदा विजेतेपद पटकाविणारा दुसरा संघ ठरणार आहे. हा या संघाचा नवीन विक्रम ठरेल. विदर्भाने दोन वर्षांपूर्वी (2017-18 मध्ये) घरच्या मैदानावर मध्य प्रदेशला नमवून प्रथमच विजेतेपद पटकाविले होते. मात्र, गतवर्षी विदर्भाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

अंतिम सामन्यात विदर्भाची भिस्त प्रामुख्याने कर्णधार मोखाडेशिवाय सध्या जोरदार फॉर्ममध्ये असलेल्या सलामीवीर आवेश शेख, महंमद फैज, अष्टपैलू मंदार महाले, दुसरा अष्टपैलू हर्ष दुबे, दानिश मालेवार, संदेश द्रुगवार व प्रेरित अग्रवाल यांच्या खांद्यावर राहणार असून, गोलंदाजीत प्रफुल्ल हिंगे, मनन दोशी व लेगस्पिनर रोहित दत्तात्रयकडून अपेक्षा राहणार आहे. उत्तराखंडचा एक डाव 44 धावांनी धुव्वा उडवून अंतिम फेरी गाठणारा कर्णधार डी. पांडेच्या नेतृत्वात खेळणारा बडोदा संघही विजेतेपदाच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.

या संघाला कर्णधार पांडे, यष्टिरक्षक के. मराठे, सलामीची जोडी पी. लक्ष्यजीत व यश रमीसह अथर्व करुळकर व पी. पाटिदार यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा राहणार आहे. त्यांचे फिरकीपटू जयपाल छड, अर्चन कोठारी, महेश पठिया, ए. पटेल व मल्हार घेवरिया हे गोलंदाजही फॉर्ममध्ये आहेत. दोन्ही संघ शक्‍तिशाली असल्यामुळे लढत रंगतदार ठरेल, यात शंका नाही.

 

"नॉर्मल' सामना समजूनच उतरणार
"फायनलचे "टेंशन' न घेता आम्ही "नॉर्मल' सामना समजूनच मैदानात उतरणार आहे. संघाने आतापर्यंत उत्तम कामगिरी केली असून, बडोद्याविरुद्ध विजयी मालिका कायम ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. आम्ही घरच्या मैदानावर खेळत असलो तरी, कसलेही दडपण घेणार नाही. उलट अनुकूल परिस्थितीत खेळण्याचा आम्हाला फायदाच होणार आहे. सर्वांनी एकजूटता दाखविली आणि सांघिक कामगिरी केल्यास नक्‍कीच पुन्हा विजेतेपद मिळवू शकतो.'
-उस्मान गनी, प्रशिक्षक
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidarbha boys ready for another record