
Vidarbha Sahitya Sangh : १० कोटींचा सुखद धक्का, संभाव्य अटी-शर्थींचा पेच!
Nagpur News: विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्धेतील साहित्य संमेलनाच्या अखेरच्या दिवशी १० कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली.
साहित्य संघात त्यामुळे आनंदाचे वातावरण असले तरी खर्चाच्या काही अटी-शर्ती असल्यास त्यानुसारच तो खर्च करावा लागणार काय, अपेक्षित कामासाठी तो खर्च करता येणार की नाही, असा पेचही निर्माण झाला आहे.
विदर्भ साहित्य संघाचे शताब्दी वर्ष मागील महिन्यात पूर्ण झाले असून १४ जानेवारी रोजी यानिमित्ताने थाटात कार्यक्रमसुद्धा पार पडला. संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शताब्दी वर्षानिमित्त राज्य शासनाला पत्र लिहीत निधीची मागणी करण्यात आली होती.
शताब्दी वर्षानिमित्त वर्षभर चालणाऱ्या सांस्कृतिक उपक्रमांच्या खर्चासाठी ही रक्कम उपयोगी यावी, असा उद्देश यामागे होता. परंतु महोत्सव होण्यापूर्वी ही रक्कम मिळाली नाही.
वर्धेतील साहित्य संमेलनामध्ये उपमुख्यमंत्र्यांनी निधी देण्याची घोषणा करून विदर्भ साहित्य संघाचे पदाधिकारी, वैदर्भीय साहित्यिकांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला.
निधी अद्याप मिळाला नसला तरी हा निधी कोणत्या कामासाठी खर्च करावा लागणार, राज्य शासन निधी देताना कुठल्या अटी टाकणार, विदर्भ साहित्य संघाच्या सांस्कृतिक संकुलातील अपूर्ण असलेल्या कामांसाठी हा निधी वापरता येईल का?, अशा अनेक प्रश्नांवर चर्चा सुरू झाली आहे.
चार दिवसानंतरही शासन निर्णयाची वाट
वि. सा. संघाचे शतक महोत्सवी वर्ष पूर्ण झाल्याने हा निधी उत्सवी, व्यासपीठीय कार्यक्रमांसाठी वापरता येईल अथवा नाही, याबाबत कोडे आहे. संस्थेच्या विदर्भातीलच प्रतिभावंत, लेखक यांच्याकडून विदर्भकेंद्री ग्रंथनिर्मिती, कोशनिर्मिती, अनुवादकार्य अशा संशोधनपर व स्थायी उपयोगाच्या वाट्याला किती निधी येतो, हे बघण्यासारखे असेल.
अर्थात, शासन निर्णय आल्यानंतरच राज्य शासनाचे निधी देण्यामागचे उद्दिष्ट आणि घातलेल्या अटीविषयी माहिती मिळेल. उपमुख्यमंत्र्यांनी घोषणा करून चार दिवसांचा अवधी लोटला असून अद्याप राज्य शासनाकडून या विषयी शासन निर्णय जारी करण्यात आलेला नाही.
विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त राज्य शासनाला पत्र लिहीत निधीची मागणी केली होती. उपमुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेल्या १० कोटींच्या विनियोगाबद्दल अद्याप कार्यकारिणीने कुठलाही निर्णय घेतला नाही. संमेलनाच्या उत्तरार्धातील कामे पूर्ण झाल्यानंतरच याबाबत बैठक घेत निर्णय घेतल्या जाईल.
- प्रदीप दाते, अध्यक्ष, विदर्भ साहित्य संघ, नागपूर