तर स्वतंत्र विदर्भाची निर्मिती अवघड नाही; प्रशांत किशोर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prashant Kishor

तर स्वतंत्र विदर्भाची निर्मिती अवघड नाही; प्रशांत किशोर

नागपूर : विदर्भ राज्याची निर्मिती करणे अवघड नाही. याकरिता प्रत्येकाला स्वतंत्र विदर्भ कशासाठी? हे आधी पटवून द्यावे लागेल आणि सर्वांना राजकारण आणि राजकारण्यांपासून लांब राहावे लागेल, असा सल्ला रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी दिला.

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी वैदर्भीयांच्या आमंत्रणावरून प्रशांत किशोर आज नागपूरला आले होते. विविध संघटना आणि चळवळीतील कार्यकर्त्यांसोबत त्यांनी चर्चा केली. प्रत्येकाची मते त्यांनी जाणून घेतली आणि आता पुढे काय करायचे याची माहिती त्यांनी दिली.

प्रशांत किशोर म्हणाले, नागपूर शहराचा अपवाद वगळता विदर्भाची परिस्थिती मागास बिहार सारखीच आहे. सर्व क्षमता असतानाही या प्रदेश उपेक्षित राहिला. पन्नास वर्षांत अनेक आंदोलने झाली. काहींनी दगा दिला. काहींनी मंच म्हणून वापर केला तर अनेकांनी राजकीय संधी म्हणून विदर्भाकडे बघितले. त्यामुळे आंदोलनाचे नुकसान झाले आहे. केवळ जय विदर्भ म्हणून राज्य भेटणार नाही. त्यासाठी ठोस उपाययोजना कराव्या लागतील.

मी तुमच्यासोबत शेवटपर्यंत लढा देईल; मध्येच आंदोलन सोडून जाणार नाही. आजवर अनेक राज्यांमध्ये आपण सत्ता बदलवली. त्यामुळे फारसा फरक पडल्याचे आढळून येत नाही. सत्तेवरचे चेहरे बदलले मात्र, व्यवस्था बदलली नाही. त्यामुळे विदर्भात आपण व्यवस्थाच बदलण्यासाठी आलो आहोत; राजकीय नीती आखण्यासाठी नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

१५० लोकांचा वर्किंग ग्रुप

पुढील बैठक हजार विदर्भवाद्यांची असावी. त्यानंतरची बैठक १० हजार लोकांची असेल. त्यात प्रत्येक ग्राम पंचायतीमधून कमीत कमी एक व्यक्ती प्रतिनिधी म्हणून असावा. यातून विदर्भातील ११ ही जिल्ह्यांतील जवळपास १५० लोकांचा वर्किंग ग्रुप तयार करावा लागेल. पहिल्या टप्प्यातील योजनेची अंमलबजावणी ६ ते ९ महिन्यात पूर्ण करावी. जानेवारी २३ पासून खरे आंदोलन सुरू होईल. जून २३ पर्यंत पहिले लक्ष्य आत्मसात करायचे आहे. त्यानंतर डिसेंबरपर्यंत विदर्भाचे संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. ३६५ ही दिवस आंदोलन होईल.

काय म्हणाले, प्रशांत किशोर...

  • चळवळीला जनआंदोलनाचे स्वरूप द्या

  • आंदोलने आक्रमक हवी, हिंसक नव्हे

  • राजकीय पक्षांपासून लांब राहावे लागेल

  • कोणावर टीकाटीपणी करणे टाळावे

  • मूक मोर्चानेही इम्पॅक्ट होतो

  • पूर्व-पश्चिम विदर्भ वाद निर्माण करू नका

Web Title: Vidarbha State Independent From Maharashtra Prashant Kishor

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..