#NagpurWinterSession : विधानसभेपाठोपाठ परिषदेतही गोंधळ, दिवसभरासाठी स्थगित 

#NagpurWinterSession : विधानसभेपाठोपाठ परिषदेतही गोंधळ, दिवसभरासाठी स्थगित 

नागपूर : विधानसभेत बॅनर फडकावल्यावरून गोंधळ उडाल्याने शिवसेना व भाजपच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. प्रकारावरून सुरू झालेल्या गोंधळामुळे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा दिवसभारासाठी तहकूब केली. दुसरीकडे विधान परिषदेत देखील शेतकऱ्यांच्या मुद्यावरून वातावरण तापले. सत्ताधारी व विरोधत आमनेसामने आल्याने सभागृहाचे कामकाज होऊ शकले नाही. अखेर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषद बुधवारपर्यंत तहकूब केली. 

पहिल्या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर व नागरिकत्त्व सुधारणा विधेयकावरून हिवाळी अधिवेशनाचे वातावरण तापले होते. दुसऱ्या दिवशी देखील अधिवेशनाला वादळी सुरुवात झाली. कामकाजाला सुरुवात होण्याआधीच भाजपच्या नेत्यांनी सकाळीच आक्रमक पवित्रा घेत विधानसभेच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात घोषणाबाजी केली. सभागृहात देखील विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

सत्तेत येण्याआधी महाविकास आघाडीने शेतकऱ्यांना हेक्‍टरी 25 हजार रुपये मदत देण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, सत्तेत येताच सरकारने पुरणवणी मागण्यांमध्ये राज्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न केला. राज्य सरकाने केंद्र सरकारच्या जीवावर हे आश्‍वास दिले होते का? आता केंद्राकडे चेंडू टोलविण्याचा केविलवाना प्रयत्न सरकारकडून सुरू असल्याची टीका फडणवीसांनी मंगळवारी केली. 

जयंत पाटील यांनी उचलून धरली सरकारची बाजू

विधान परिषदेत सुरू असलेल्या सत्ताधारी आणि विरोधकांच्या संघर्षात अर्थमंत्री जयंत पाटील यांनी सरकारची बाजू उचलून धरण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांना दिलेले वचन हे सरकार पाळणार आहे. शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी केंद्राकडे 14 हजार कोटींची मागणी करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली. मात्र, केंद्राने अद्याप मदत केली नसल्याचे ते म्हणाले. केंद्राकडून मदत मिळाली नाही तरीदेखील आम्ही शेतकऱ्यांना भरीव मदत करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. 

शेतकऱ्यांना हेक्‍टरी 25 हजार रुपयांची मागणी करीत विधानसभेत विरोधी पक्षातील आमदारांनी विधानसभेत दुसऱ्या दिवशी देखील बॅनर झळकावले. हे बॅनर सत्ताधारी पक्षातील आमदाराने हिसकाविण्याचा प्रयत्न केल्याने दोन्ही पक्षांच्या आमदारांनी एकमेकांना धक्काबुक्की केली. हा गोंधळ लक्षात घेता विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी अर्ध्या तासासाठी कामकाज थांबवले. कामकाज सुरू झाल्यावर अध्यक्षांनी दोन्ही बाकांवर बसलेल्या सदस्यांना समज दिली. मात्र, यानंतरही विरोधकांनी सभागृहात घोषणाबाजी केल्याने अध्यक्षांनी विधानसभा दिवसभारासाठी तहकूब केली. 

विधानसभेत सेना-भाजप आमदारांमध्ये धक्काबुक्की

सावरकरांच्या मुद्यावरून विरोधकांनी पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहात गोंधळ घातला. यावेळी गोंधळादरम्यान विरोधी पक्षातील काही सदस्यांनी सावरकरांचे बॅनर झळकावले होते. दुसऱ्या दिवशीही विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत, शेतकऱ्यांना हेक्‍टरी 25 हजार रुपयाची मदत करावी अशी मागणी करीत परिसरात आंदोलन करीत सरकारविरोधी घोषणाबाजी केली. विधानसभेचे कामकाज सुरू होताच, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नियम 57 अन्वये सूचना देत चर्चेची मागणी केली. 

शेतकऱ्यांसाठी पुरवणी मागण्यामध्ये कमी तरतूद करण्यात आलेली असून त्यांना शेतकऱ्यांना हेक्‍टरी 25 हजार मदत मिळत नाही, तोपर्यंत सभागृह चालू देणार नाही, अशी भूमिका देवेद्र फडणवीस म्हणाले. यावेळी विरोधी पक्षाच्या आमदारांनी वेलमध्ये येऊन घोषणाबाजी सुरू केली. आमदार अभिमन्यू पवार आणि नारायण कुचे यांनी बॅनर काढून पुन्हा झळकावण्यास सुरुवात केली. अध्यक्षांनी त्यांना "जागेवर बसा, बॅनर फडकवू नका' असे आवाहन केले.

याचदरम्यान सत्तापक्षाकडून आमदार संजय रायमूलकर यांनी समोर येत, अभिमन्यू पवार यांच्या हातातील बॅनर हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दोन्ही पक्षांमधील आमदार समोरासमोर येऊन एकमेकांना धक्काबुक्की केली. दरम्यान, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार आशिष शेलार, शिवसेनेचे भास्कर जाधव, रविंद्र वायकर यांनी मध्यस्ती केली.

यानंतरही सभागृहात वेळमध्ये विरोधीपक्षाच्या आमदारांनी येऊन घोषणाबाजी सुरू ठेवल्याने अध्यक्षांनी अर्ध्या तासासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले. यानंतर कामकाज सुरू होताच, अध्यक्षांनी दोन्ही पक्षांच्या आमदारांना समज दिली. मात्र, शेतकऱ्यांना मदत मिळण्याची मागणी करीत विरोधकांनी घोषणबाजी करीत, गोंधळ कायम ठेवला. या गोंधळादरम्यान चार विधेयक मंजूर करण्यात आली. यानंतर अध्यक्षांनी सभेचे कामकाज उद्यापर्यंत स्थगित केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com