ग्रामीणमध्ये तीन टक्के कोणाला भोवणार? 

वीरेंद्रकुमार जोगी
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सहा मतदारसंघात मागच्या विधानसभेत एकूण मतदान 67 टक्के होते. या वेळी त्यात तीन टक्‍क्‍यानी घट झाली असून, मतदानाची टक्केवारी 64.51 आहे. लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत दोन टक्‍क्‍यांनी वाढ झाल्याचे चित्र आहे.

नागपूर : ग्रामीण भागात मतदानाची टक्‍केवारी 60च्या वर गेली असली तरी मागील निवडणुकीच्या तुलनेत सुमारे तीन टक्‍क्‍यांनी त्यात घसरण झाली आहे. या तीन टक्‍क्‍यांचा फटका कोणाला बसणार? याचा खुलासा गुरुवारी होणार आहे. नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सहा मतदारसंघात मागच्या विधानसभेत एकूण मतदान 67 टक्के होते. या वेळी त्यात तीन टक्‍क्‍यानी घट झाली असून, मतदानाची टक्केवारी 64.51 आहे. लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत दोन टक्‍क्‍यांनी वाढ झाल्याचे चित्र आहे. सावनेर आणि काटोलमध्ये मागील निवडणुकीत विजयी आणि पराभूत झालेल्या उमेदवारांच्या मतांमध्ये फारच कमी अंतर होते.
निवडणूक विभागाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक घट नागपूर शहरालगतच्या हिंगणा व कामठी मतदारसंघात झाल्याचे चित्र आहे. हिंगणा मतदारसंघात मागील विधानसभा निवडणुकीत 66 टक्के मतदान झाले होते. त्या तुलनेत यंदा तब्बल सहा टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. लोकसभा निवडणुकीत 58 टक्‍के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. कामठी मतदारसंघातही तीन टक्के घट झाली आहे. मागील विधानसभेत 62 टक्के मतदान झाले होते. लोकसभेसाठी 58 टक्के मतदान झाले होते. रामटेक व उमरेड मतदारसंघात गत विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत दोन टक्के मतदान कमी झाले आहे. लोकसभेची आकडेवारी पाहिल्यास रामटेकमध्ये 64 तर उमरेडमध्ये 67 टक्के मतदान झाले होते. काटोल व सावनेर मतदारसंघात एक टक्का मतदान कमी झाले आहे. लोकसभेत काटोलमध्ये 64 तर सावनेरमध्ये 62 टक्के मतदान झाले होते. याच वर्षी झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या आकडेवारीवर नजर फिरविल्यास काटोल व सावनेर या दोन्ही मतदारसंघांत पाच टक्के मतदान वाढले आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात एकूण 21 तृतीयपंथी असताना केवळ दोघांनीच मतदानाचा अधिकार बजावला आहे. सर्वाधिक 14 तृतीयपंथी हिंगणा मतदासंघात आहेत.
...तर वेगळे चित्र दिसेल 
विधानसभा लढणारा उमेदवार मतदारांच्या जास्त जवळचा असल्याने लोकसभेच्या तुलनेत विधानसभेची निवडणूक ही कार्यकर्ते व नेते मिळून लढत असल्याने त्यात उत्साह जास्त असतो. स्थानिक मुद्दे व समस्यांना प्राधान्य दिले जाते, हे विशेष. पाच वर्षांत मतदारसंख्येत वाढ झाली आहे. शिक्षित मतदारांची संख्या वाढली असतानाच मागील निवडणुकीच्या तुलनेत मतदान टक्केवारीत झालेली घट वेगळे चित्र निर्माण करू शकते, असाही अंदाज लावण्यात येत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vidhan sabha election news