अपहरण करून कुख्यात विजय मोहोडचा खून 

अपहरण करून कुख्यात विजय मोहोडचा खून 
Updated on

नागपूर - क्रिकेट बुकीला केलेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी सेटलमेंट करण्याच्या बहाण्याने बोलावून कुख्यात गुंड विजय नारायण मोहोड (वय 27, नरसाळा, हुडकेश्‍वर) याचा खून करण्यात आला. बिट गॅंगने त्याचा खून केल्याचे उघडकीस आले असून, हुडकेश्‍वर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. सोमवारी हत्याकांड उघडकीस आले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुने वैमनस्य तसेच नवीन जुगार अड्‌डा उघडल्याने विजय मोहोड आणि बिट गॅंगमध्ये अनेक दिवसांपासून शीतयुद्ध सुरू होते. बिट गॅंगमधील अभय राऊत, बॉबी धोटे, निखिल तिडके, लल्ला मिश्रा, काल्या शाहू, दिलीप ठवकर, सूरज कार्लेवार यांच्यासह 10 ते 15 आरोपींनी विजू मोहोडचा "गेम' करण्यासाठी कट रचला. मोहोड हा रविवारी रात्री आउटर रिंग रोडवरील अमित सावजी भोजनालयात मित्र रूपेश बोंडे आणि चंद्रशेखर वैद्य यांच्यासोबत जेवण करीत होता. निखिल तिडके याने विजूला जमीन दाखविण्याच्या बहाण्याने एका ठिकाणी बोलावले. तेथे आधीच पाच ते सहा कारसह सुमारे 25 आरोपी उभे होते. त्यांनी मोहोडला कारमध्ये कोंबले. वेळा हरिश्‍चंद्र गावाजवळील जंगलात नेले. तिथे चाकू, तलवारी, गुप्तींनी भोसकून मोहोडचा मोठ्या निर्घृणपणे खून केला. मृतदेह वेळा हरिश्‍चंद्र गावाजवळ रस्त्यावर फेकून दिला. आज सोमवारी पहाटेच्या सुमारास पोलिसांना विजूचा मृतदेह आढळला. हुडकेश्‍वर पोलिसांनी बिट गॅंगमधील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

अफवा आणि खून 
गुन्हेगारी जगतात विजय मोहोडचे "टॉप फाइव्ह'मध्ये नाव घेतले जाते. त्याचा रविवारी खून झाल्याची अफवा पसरली होती. त्यामुळे शहर आणि ग्रामीण पोलिस सतर्क झाले होते. रविवारी रात्रीच शेकडो किलोमीटरचा परिसर पोलिसांनी पालथा घातला होता. 

अनेक हत्याकांडांत समावेश 
भरदिवसा खून करणे, चाकूच्या धाकावर लूटमार करणे, खंडणी वसुली आणि क्रिकेट सट्‌टेबाजी आणि जुगार अड्‌डा चालविण्यासाठी मोहोड ओळखला जात होता. त्याच्याविरुद्ध कुही, कन्हान, हुडकेश्‍वर आणि अन्य ठाण्यांत खुनाचे गुन्हे दाखल आहेत. 10 दिवसांपूर्वी बुटीबोरीच्या डान्सबारमध्ये विजय मोहोडसह अर्जुन रेड्‌डी, अभय, दिलीप, उल्ला, गोलू गोंडे उपस्थित होते. येथे अभय आणि विजयमध्ये तु-तु-मैं-मैं झाली होती. 

बिट गॅंगचा म्होरक्‍या शरण 
बिट गॅंगचा म्होरक्‍या स्वप्निल साळुंखे याच्यावर 2017 मध्ये ईप्पा गॅंगच्या मदतीने पोलिसांवर हल्ला केल्याचा गुन्हा दाखल होता. या प्रकरणात दोन दिवसांपूर्वी स्वप्निल पोलिसांना शरण आला. विजय मोहोडच्या हत्याकांडात आपले नाव येऊ नये याकरिता त्याने आधीच शरणागती पत्करल्याची शंका व्यक्त केली जात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com