राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार नाही हे खरे; मात्र, नियम कडक

Vijay Vadettiwar said there is no lockdown in the state but the rules are strict
Vijay Vadettiwar said there is no lockdown in the state but the rules are strict

गडचिरोली : लॉकडाऊनच्या भीतीने पुन्हा नागरिक धास्तावले आहेत. तसेच कोरोनाबाबत काळजी न घेता त्यांचा वावरही सार्वजनिक ठिकाणी सुरू आहे. राज्यात कोरोना पुन्हा डोके वर काढत आहे. संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करावी, असे निर्देश राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दूरचित्र बैठकीद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार नाही हे खरे आहे. आर्थिक चक्र पूर्ववत येत असताना पुन्हा लॉकडाऊन न करता आपण काळजी घेऊ व संसर्गाला रोखू. मंगल कार्यालये व सांस्कृतिक हॉल या ठिकाणी सर्वांत जास्त गर्दी असते. अशा ठिकाणी मर्यादा ओलांडणाऱ्या व नियमांची अंमलबजावणी न करण्यावर कारवाई करा, असे आदेश दिले.

कोरोनाबाबत आवश्‍यक ती काळजी घेऊन उद्योग, कारखाने व शिक्षण प्रक्रिया सुरू ठेवणे आवश्‍यक आहे. प्रत्येकाला दैनंदिन जीवन जगण्यासाठी पैशाची गरज असते. हाताला काम असेल, तर रोजीरोटी चालते. तसेच शिक्षणातून उद्याची पिढी घडत आहे. या दोन्ही बाबी अत्यंत गरजेच्या असून त्यामध्ये खंड पडू देऊ नये, असेही वडेट्टीवार म्हणाले.

गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यांतील कित्येक मजूर कामानिमित्त शेजारच्या तेलंगणा राज्यात गेले आहेत. त्यांना आता लॉकडाऊनची भीती वाटत आहे. त्यांनी कोणत्याही प्रकारे भीती बाळगू नये, असे आवाहन वडेट्टीवार यांनी केले. लोक अकारण नियमांचे उल्लंघन करीत असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करा, असे निर्देशही त्यांनी उपस्थितांना दिले.

यावेळी गडचिरोलीतील जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, प्रभारी जिल्हाधिकारी सोनाप्पा यमगर, निवासी उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल रुडे, जिल्हा आरोग्य अधिकारी शशिकांत शंभरकर व डॉ. विनोद मशाखेत्री उपस्थित होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्ह्यातील रुग्ण, दैनंदिन चाचण्या, कोरोना रुग्णालये व स्टाफ याबद्दलची माहिती दिली.

विदर्भातील पाच जिल्ह्यांना निधी

विदर्भातील पाच जिल्ह्यांना आरोग्यविषयक इमारतींच्या फायर ऑडीटनंतर लागणाऱ्या उपाययोजनांसाठीचा निधी प्राधान्याने एसडीआरएफमधून देऊ, असे आश्‍वासन विजय वडेट्टीवार यांनी दिले. ऑडिट झाल्यानंतर प्रत्येक रुग्णालयात आवश्‍यक आगरोधक यंत्रणा उभारणे गरजेचे असून याबाबत नियोजन करा, अशा सूचनाही त्यांनी उपस्थितांना दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com