पालकमंत्र्यांनी घेतला कॉंग्रेस नगरसेवकांचा क्‍लास; आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर बैठक

श्रीकांत पशेट्टीवार 
Monday, 18 January 2021

चंद्रपूर शहर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक पुढीलवर्षी होऊ घातली आहे. कोणत्याही परिस्थितीत महापालिकेवर कॉंग्रेसची सत्ता स्थापन करण्याच्यादृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.

चंद्रपूर : महानगरपालिकेतील भाजपची सत्ता उलथवून लावत आगामी निवडणुकीत कॉंग्रेसचा झेंडा फडकविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात भेटीगाठी सुरू कराव्या. नागरिकांच्या समस्या प्राधान्यक्रमाने सोडवाव्या. यासोबतच मागील पाच वर्षांत भाजप सत्ताधाऱ्यांनी केलेला भ्रष्टाचार जनतेच्या दरबारापर्यंत पोहोचवावे, अशा सूचना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी कॉंग्रेस पक्षाच्या नगरसेवकांना केल्या.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक पुढीलवर्षी होऊ घातली आहे. कोणत्याही परिस्थितीत महापालिकेवर कॉंग्रेसची सत्ता स्थापन करण्याच्यादृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामुळे कॉंग्रेसचे चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी यांच्या पुढाकारातून सोमवारी (ता. 18) शासकीय विश्रामगृहावर पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत कॉंग्रेस नगरसेवकांची बैठक आयोजित केली. या बैठकीत नगरसेवकांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री वडेट्टीवार बोलत होते.

हेही वाचा - संपूर्ण विदर्भातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल एका क्लिकवर; वाचा कोणी कुठे मारली बाजी   

चंद्रपूर महानगरपालिकेवर भाजपची सत्ता आहे. सत्ताधारी कॉंग्रेस नगरसेवकांना निधी देण्यात हात आखडता घेतात. कॉंग्रेस नगरसेवकांच्या प्रभागातील समस्या सोडविण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात, अशा अनेक समस्यांचे गाऱ्हाणे कॉंग्रेस नगरसेवकांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यापुढे मांडले. 

त्यानंतर पालकमंत्री वडेट्टीवार यांनी प्रभागातील विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. कोणत्याही परिस्थितीत कॉंग्रेस पक्षाची सत्ता महापालिकेवर स्थापन करण्याच्या दृष्टीने सर्वांनी ताकदीने प्रयत्न करण्याची गरज आहे. यासोबतच मागील पाच वर्षांत सत्ताधाऱ्यांनी अनेक कामांत भ्रष्टाचार केलेला आहे. हा भ्रष्टाचार जनतेच्या दरबारापर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू करावे, असेही सांगितले.

नक्की वाचा - जन्मदाता बापच करत होता घृणास्पद कृत्य; अखेर दिरानं उचलला विडा अन् घडला थरार

या बैठकीला नगरसेवक नंदू नागरकर, सुनीता लोढिया, संगीता भोयर, अमजद अली, प्रशांत दानव, डॉ. सुरेश महाकुलकर, नीलेश खोब्रागडे, ललिता रेवल्लीवार, विना खनके, कॉंग्रेस महिला आघाडी शहर जिल्हाध्यक्ष सुनीता अग्रवाल यांच्यासह कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vijay Wadettiwar plans for upcoming Chandrapur Elections