हे गाव होणार भारनियमनमुक्त

प्रा.अविनाश बेलाडकर
Tuesday, 12 November 2019

- मधापुरी गाव उजेडणार
- विजेचा लपंडावाला बाय बाय
- गावकऱ्यांची भारनियमनापासून सुटका
- महासौरउर्जा प्रकल्पातून गाव होणार स्वयंपूर्ण

मूर्तिजापूर: विजेचा लपंडाव, विजेचे भारनियमन आणि राक्षसी वीज देयके इत्यादी संकटांपासून स्वतःची सुटका करवून घेण्याचा मार्ग मूर्तिजापूर तालुक्यातील मधापुरी या गावाला सापडला असून पंतप्रधान महासौरउर्जा प्रकल्पांतर्गत हे गाव वीज पुरवठ्यासंदर्भात महिनाअखेरीस आत्मनिर्भर व स्वयंपूर्ण होणार आहे.

वीज निर्मितीसाठी लागणारी खानिज संपत्ती मर्यादित असल्यामुळे सूर्याच्या प्रकाशापासून मिळविल्या जाणाऱ्या सौरउर्जेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमर्यादित काळासाठी अमर्याद प्रमाणात सौरउर्जा उपलब्ध होऊ शकते. ही सौरउर्जा तंत्रशुद्ध पद्धतीचा वापर करून उपयोगात आणली जाऊ शकते. विजेवर चालणारी जवळपास सर्वच उपकरणे चालविण्याची क्षमता धारण करणाऱ्या महासौरउर्जा प्रकल्पाच्या उभारण्याची प्रक्रिया मूर्तिजापूर तालुक्यातील मधापुरी या गावात पूर्णत्वास जाण्याच्या अंतिम टप्प्यात आहे.

ग्राम पंचायतीच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविला जात असून सौरउर्जेच्या पॅनल उभारणीसाठी पक्क्या घराच्या छतावरील 15 बाय 20 फुटांची जागा आवश्यक असते. त्यामुळे महिन्याकाठी 700 रुपयांपेक्षा अधिक वीजदेयक येणारी पक्की घरे त्यासाठी ग्राम पंचायतीने निवडली. 100 टक्के अनुदानावर उपलब्ध असणाऱ्या या प्रत्येक युनिटसाठी केवळ 500 रूपये प्रक्रिया खर्च अपेक्षित आहे.

सुरूवातीला या प्रकल्पासाठी आवश्यक ती सर्व प्रक्रिया अॉनलाईन पार पाडली जात आहे. प्रत्येक घरावरील पॅनल 3 केव्ही वीजनिर्मिती करेल. संबंधित घराला लागणाऱ्या विजेव्यतिरिक्त उर्वरीत साधारणतः अडीच केव्ही वीज महावितरणच्या 33 केव्ही क्षमतेच्या उपकेंद्राला देण्यात येईल. तेथून ती अन्य आर्थिकदृष्ट्या दूर्बल घटक कुटुंबीयांना वितरीत करण्यात येऊन विजेच्या बाबतीत गाव स्वयंपूर्ण झालेले असेल.

100 पक्क्या घरांची निवड झाली आहे. हा महिनाअखेर 10 घरांवरील पॅनल उभारणीसह प्रकल्पाचा शुभारंभ समारंभपूर्वक जिल्हाधिका-यांच्या उपस्थितीत केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते होईल. यथावकाश 100 घरांवरील पॅनल उभारणी केली जाईल. संपूर्ण जिल्ह्यात हा उपक्रम राबविण्यात पुढाकार घेतला जाईल. चक्की, वीज पंप अशी सगळीच विद्युत उपकरणे या विजेवर चालतील.
-प्रदीप ठाकरे, सरपंच, मधापुरी. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: this village will be free of load