...या तालुक्यात घडले असे काही अन् वाहू लागला दारूचा महापूर!

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 3 May 2020

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाउन असून, संचारबंदी लागू आहे. देशी, विदेशी मद्याच्या दुकानांना टाळे लागले आहेत.

मोताळा (जि.बुलडाणा) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशी, विदेशी मद्य विक्री बंद असल्याने गावठी दारू अड्ड्यांना उधाण आले आहे. तालुक्यातील नळकुंड शिवारातील नळगंगा नदीपात्रात गावठी दारूचा जणू महापूर वाहू लागला. दरम्यान, येथील गावकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेऊन जवळपास १६ दारू अड्डे उद्ध्वस्त केले.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाउन असून, संचारबंदी लागू आहे. देशी, विदेशी मद्याच्या दुकानांना टाळे लागले आहेत. परंतु तळीरामांना कोणत्याही मार्गाने दारूची तलफ भागवायची असते. याचा गैरफायदा घेत बहुतांश ठिकाणी गावठी दारू अड्डयांना उधाण आले. तालुक्यातील नळकुंड शिवारातील नळगंगा नदीपात्रात जणू गावठी दारूचा महापूर वाहू लागला. त्यामुळे बाहेरगावच्या तळीरामांचा वावर वाढला.

हेही वाचा - जागतिक हास्य दिन : हसण्याचे आहेत हे फायदे; का साजरा करतात हास्य दिन?...वाचा

त्यांच्यामुळे गावात कोरोनाची लागण होऊ नये, म्हणून गावकऱ्यांनी गावठी दारू अड्ड्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली. गोर सेना मंडळ व गावकऱ्यांनी येथील नळगंगा नदीपात्रातील गावठी दारू अड्ड्यांना हुडकून काढले. मागील दोन दिवसात शोध मोहीम राबवून गावकऱ्यांनी जवळपास १६ गावठी दारू अड्डयांना उद्ध्वस्त केले. सोबतच गावठी दारू गाळणाऱ्यांना समज देण्यात आली. गावकऱ्यांचा रुद्रावतार पाहून दारू गाळणाऱ्यांसह तळीरामांची पाचावर धारण बसली आहे, एवढे मात्र नक्की.

आवश्‍यक वाचा - बापरे! या धरणाला लागली गळती; भिंतीलाही गेले तडे...मग कारण बनतील खेकडे

पोलिसांना सांगूनही उपयोग नाही
तालुक्यातील धामणगाव बढे पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या नळकुंड शिवारात गावठी दारू अड्डयांना उधाण आले आहे. याबाबत धा.बढे पोलिसांना वारंवार सांगूनही कुठलीच कारवाई झाली नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. दरम्यान, संतप्त गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेऊन स्वतः गावठी दारू अड्डयांना उद्ध्वस्त केले. संबंधितांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Villagers come to liquor den and destroyed liquor in buldana district