रात्र वैऱ्यांची! धानपिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांसह गावकऱ्यांचे ‘जागते रहो’

संदीप रायपूरे
Friday, 20 November 2020

प्रशासनानेही त्यांच्या भावना समजून मार्ग काढण्याचे ठरविले. मग धान निघेपर्यंत या भागात पोलिसांची रात्रभर गस्त घालण्याचे आदेश देण्यात आले. आता आक्सापूर परिसरात पोलिस व गावकरी मिळून ‘जागते रहो’चा नारा देत आहेत.

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : यंदा निसर्गाने साथ दिली अन् शेतकऱ्याची मेहनत कामी आली. दोन वेगवेगळ्या शेतातून किमान दोनशे क्विंटल धान निघणार म्हणून कुटुंबीय समाधानी होते. पण, ऐन दिवाळीत कंटकांनी दोन दिवसांच्या अंतराने सारेच पुंजणे जाळले. उद्या आपलेही पुंजण जळेल या भीतीने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. यामुळे प्रशासनाच्या सहकार्याने गावकऱ्यांनी ‘जागते रहो’चा नारा दिला आहे. गोंडपिपरी तालुक्यातील आक्सापुरात परवापासूनच पोलिसांच्या चमूसह गावकरी पहारा देत आहेेत.

आक्सापूर हे गाव धानपीक घेणाऱ्या शेतकऱ्यांच गाव म्हणून ओळखले जाते. धानाच्या सिझनमध्ये सतत चार महिने मेहनत घ्यायची अन् आपल वर्षभराच्या कारभाराच नियोजन करायच. हा येथील शेतकऱ्याचा नित्यक्रम. पण यावेळी मात्र ते कमालीचे धास्तावले आहेत. ऐन दिवाळीच्या दिवशी आक्सापुरातील रूषी धोडरे यांच्या शेतातील तीन धानाचे पुजंणे कंटकांनी जाळले. घटनेच्या दोन दिवसानंतर पुन्हा त्याच्या दुसऱ्या शेतातील दोन पुंजणे जाळले.

क्लिक करा - अकोल्यातील भाजपचा बडा नेता काँग्रेसच्या गळाला, राष्ट्रवादीलाही गळती

दोन्ही घटनांमध्ये धोडरे यांचे जवळपास दोनशे क्विंटल धानपीक जळून खाक झाले. गावातील सहकारी शेतकरी बांधवांचे धानपुंजणे जाळल्याने अख्ख्या गावात संतापाची लाट पसरली आहे. हे असले कंटक उद्या आपल्याही धानाचे पुंजणे जाळतील ही भीती त्यांच्यात पसरली आहे. राजुऱ्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील जाधव, गोंडपिपरीचे तहसीलदार के. डी. मेश्राम, कोठारीचे ठाणेदार तुषार चव्हाण यांच्यासमोर त्यांनी आपली भीती बोलून दाखवली.

प्रशासनानेही त्यांच्या भावना समजून मार्ग काढण्याचे ठरविले. मग धान निघेपर्यंत या भागात पोलिसांची रात्रभर गस्त घालण्याचे आदेश देण्यात आले. आता आक्सापूर परिसरात पोलिस व गावकरी मिळून ‘जागते रहो’चा नारा देत आहेत. आक्सापूर परिसरातील शेत्या या जंगलाला लागून आहे. अशावेळी वन्यजींवापेक्षा आता कंटकांचा जास्त धोका बळीराजाला वाटू लागला आहे.

हेही वाचा - चला मुलांनो, सोमवारपासून शाळेत या! ऑनलाईन बैठकीत घेतला निर्णय

शेतात खडा पहारा

पोलिस गस्त करीत असले तरी शेतकऱ्यांच्या कुटुंब शेतात खडा पहारा देत आहेत. काही शेतकरी बांधव लगबगीने धानलावण्याच्या कामात लागले आहेत.

पोलिसांनी रात्रीची गस्त सुरू
आक्सापुरात शेतकऱ्याचे पुंजणे जाळल्याप्रकरणानंतर गावकऱ्यांची मागणी लक्षात घेता परिसरात पोलिसांनी रात्रीची गस्त सुरू केली आहे.
- तुषार चव्हाण,
ठाणेदार कोठारी

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Villagers deployed with police for security of paddy crops