जारावंडीत ना बँक ना रस्ता, आर्थिक व्यवहारासाठी करावी लागतेय ५५ किलोमीटर पायपीट

villagers facing problems for banking due to not available basic facilities in jarawandi of gadchiroli
villagers facing problems for banking due to not available basic facilities in jarawandi of gadchiroli

जारावंडी (जि. गडचिरोली) : जारावंडी हे गाव एटापल्ली तालुक्‍याच्या शेवटच्या टोकावर आणि छत्तीसगड राज्याला लागून आहे. या अतिदुर्गम परिसरात अद्याप बँकेची सुविधा नाही. त्यामुळे येथील नागरिकांना आर्थिक व्यवहारांसाठी तब्बल 55 किलोमीटर अंतरावरील एटापल्ली तालुक्‍यात जावे लागते. त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत असून येथे राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखेची स्थापना कधी होणार, असा प्रश्‍न येथील नागरिक विचारत आहेत.

जारावंडी परिसराचा लगतच्या आदिवासी भागातील 50 ते 60 गावांशी संपर्क जोडला आहे. म्हणजे जवळपास 15 ते 20 हजार लोकसंख्येने हा परिसर व्यापला आहे. परंतु, या परिसरात बँकेची सुविधा नसल्याने नागरिकांची हेळसांड होत आहे. बँक व्यवहाराबद्दल नागरिक अनभिज्ञ आहेत. त्यामुळे नागरिकांना बँक व्यवहारासाठी 55 किलोमीटर अंतरावरील एटापल्ली तालुका गाठावा लागतो. आजकाल बॅंकेत खाते उघडण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती होत असून प्रत्येक कामासाठी बॅंकेचे खाते अनिवार्य झाले आहे. प्रत्येक योजनेचा आर्थिक लाभ, प्रत्येक कामाचा मोबदला बँकेच्या खात्यावरच जमा केला जातो. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विविध योजनेचे अर्थसाहाय्य राष्ट्रीयीकृत बॅंकेच्या खात्यामध्ये जमा होते. महिला बचतगटाचा वाढलेला व्याप विस्तार, वृद्धांना मिळणारे निवृत्ती अर्थसाहाय्य, गरिबांना मिळणाऱ्या घराच्या बांधकामाच्या आर्थिक अर्थसाहाय्याचा लाभ, रोजगार हमी योजनेच्या कामाचा मोबदला, शेतकऱ्यांचे पीककर्ज, सोने तारण, इतर प्रकारचे कर्ज आणि विविध योजनेचे आर्थिक मदत आणि वैयक्तिक दैनंदिन आर्थिक व्यवहार, असे एकंदरीत सर्वच व्यवहार बँकेमधून होत आहेत. परंतु, जारावंडीत बँकच नसल्याने नागरिक या सर्व गोष्टीपासून वंचित आहेत. 

जारावंडी परिसरात राष्ट्रीयीकृत बँक नसल्याने नागरिकांना थेट 55 किमी गाठून एटापल्लीला जावे लागते. तिथेही रोजच गर्दी असते. याशिवाय नेटची चांगली सुविधा नसल्याने अनेकवेळा लिंक फेल होते. तिथे बसण्या, उठण्याची पुरेशी सुविधाही नसल्याने ज्येष्ठ नागरिकांना चक्कर येऊन ते खाली पडण्याचे प्रकारही घडत आहेत. अशात पैसे भरण्या व काढण्यासाठी सुमारे 55 किमी अंतरावर गेलेल्या लोकांना काम न करताच परतावे लागते. म्हणून या सर्व बाबी जाणून जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ बॅंकेची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

समस्यांचे माहेरघर -
अतिदुर्गम जारावंडी परिसरात रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण अशा पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने हा परिसर समस्यांचे माहेरघर झाला आहे. येथील नागरिकांना सतत समस्यांचा सामना करावा लागतो. अनेक गावांत रस्त्यांची दुरवस्था आहे, तर काही ठिकाणी रस्तेच नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात या परिसरात आवागमन करणे कठीण होऊन बसते. अनेक गावांत वीजपुरवठा होत नाही. काही ठिकाणी विजेची सोय असली, तरी वीजपुरवठा वारंवार खंडित होतो. आरोग्य कर्मचारी कर्तव्यस्थळी नियमित उपस्थित राहत नसल्याने रुग्ण व नातेवाइकांची प्रचंड गैरसोय होत आहे. शिक्षणाच्या बाबतीतही दुर्लक्ष होताना दिसत आहे. अनेक वर्षांपासून मागणी करूनही त्यांच्या साध्या, सोप्या समस्याही सोडविण्यात आल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. या परिसरात पायाभूत सुविधा निर्माण करून या परिसराचा विकास करावा, अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com