गाडेगाववासीयांचे पुनर्वसन होणार की नाही? सात वर्षांपासून पुनर्वसनाची प्रतीक्षा

villegers of gadegaon waiting for Rehabilitation
villegers of gadegaon waiting for Rehabilitation

गडचांदूर (जि. चंद्रपूर) : कोरपना तालुक्‍यातील गाडेगाव येथे पैनगंगा वेकोलि खाण सुरू झाली आहे. वेकोलि व्यवस्थापनाने गावातील काही नागरिकांची घरे पाडली. या नागरिकांना आर्थिक मदत मिळणार होती. मात्र, दहा महिने लोटूनही मदत मिळाली नाही. उलट दहा महिन्यांपासून या नागरिकांना उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. खाणीमुळे गावात सोयीसुविधा येतील असे वाटत असताना नशिबात केवळ समस्यांचा डोंगर असल्याचा आरोप दत्तकगाव असलेल्या गाडेगाववासींकडून केला जात आहे.

कोरपना तालुक्‍यातील गाडेगाव हे गाव वेकोलि खाणीमुळे प्रसिद्धीस आले. खाणींमुळे समस्या सुटून चांगले दिवस येतील, अशी येथील नागरिकांना आशा होती. गावातील अनेकांची शेती अधिग्रहीत करून मोबदला देण्यात आला आहे. मात्र, सहा-सात वर्षे लोटूनही गावाचे पुनर्वसन झालेले नाही. त्यामुळे वेकोलि व्यवस्थापनाने तातडीने गावाचे पुनर्वसन करून सोयीसुविधा पुरवाव्या, अशी मागणी केली जात आहे. खाणीमध्ये दररोज ब्लॉस्टिंग केल्या जाते. त्यामुळे घरांना भेगा पडत असून, अनेकांच्या घरातील भांडे पडण्याचे प्रकार घडत आहेत.

पैनगंगा वेकोलि व्यवस्थापनाचे दुर्लक्ष

वेकोलि व्यवस्थापनाने संपूर्ण गाव अधिग्रहीत केले आहे. त्यामुळे 2019-20 या वर्षातील कर ग्रामपंचायतीला जमा करणे गरजेचे आहे. मात्र, वेकोलिकडून कराची रक्कम ग्रामपंचायतीला न देता गावातील नागरिकांना धनादेशाद्वारे वितरित केली जात आहे. दहा महिन्यांपूर्वी काही नागरिकांची घरे पाडली. मात्र, अजूनही त्या कुटुंबीयांना भरपाई देण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये वेकोलि व्यवस्थापनाविरोधात संताप व्यक्त होत आहे. यासंदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी वेकोलि व्यवस्थापनाशी संपर्क केला. मात्र, होऊ शकला नाही.

गावातील ज्यांची घरे पाडण्यात आली त्यांना तातडीने आर्थिक साहाय्य करावे. गावाचे हित लक्षात घेता पुनर्वसन करण्यात यावे. वेकोलि व्यवस्थापनाने 2019-20 च्या कराचा भरणा करूनच इतर दस्तऐवजांची मागणी करावी.
- सुभाष रघुनाथ दाळे, सरपंच, गाडेगाव

कोरोनाची सर्वत्र दहशत असताना वेकोलितून कोळशाची वाहतूक करणाऱ्या वाहनांचे चालक गावात येत असतात. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. वेकोलिने तातडीने गावाचे पुनर्वसन करावे.
- संतोष मडावी, पोलिस पाटील, गाडेगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com