नक्षलवाद्यांनो, आता तुमची खैर नाही...याद राखा या गावांत याल तर?

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 30 April 2020

अहेरी तालुक्‍यातील किष्टापूर नाल्यावर सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामाची नासधूस केल्याने संतप्त झालेल्या 16 गावांतील ग्रामस्थांनी नक्षलवाद्यांना गावबंदी केली आहे. नक्षलवाद्यांनो, आता तुमची खैर नाही...याद राखा आमच्या विकासात खोडा घालाल तर...अशी चेतावणी देऊन 16 गावांतीाल नागरिकांनी नक्षल्यांना गावबंदी केली आहे.

गडचिरोली : अहेरी तालुक्‍यातील किष्टापूर परिसरातील नागरिकांना पावसाळ्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता, याची दखल घेत प्रशासनाने नुकतेच किष्टापूर नाल्यावर पुलाचे बांधकाम सुरू केले होते. मात्र, नक्षलवाद्यांनी ते काम बंद पाडले आहे.

गेल्या 8 एप्रिल रोजी नक्षलवाद्यांनी किष्टापूर येथील नाल्याच्या पुलाच्या बांधकामावरील वाहनांचीही जाळपोळ केली होती. त्यामुळे या गावांतील नागरिक संतप्त झाले असून नक्षलवाद्यांच्या या कृत्याचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदविला होता.

पुलाच्या बांधकामासाठी पाठपुरावा

या पुलाचा फायदा या भागातील अनेक गावांना दळणवळणासाठी होणार होता. पावसाळ्यात या नाल्याला पूर आल्यानंतर या भागातील ग्रामपंचायतींचा गडचिरोली जिल्ह्याशी संपर्क पूर्णपणे तुटतो. त्यामुळे विद्यार्थी, मजूर व रुग्णांना त्रास सहन करावा लागतो. या समस्येची गडचिरोली पोलिस दलाने दखल घेऊन पुलाच्या बांधकामासाठी पाठपुरावा केला. पुलाच्या बांधकामाला मंजुरी मिळाल्यानंतर गेल्या महिन्यात किष्टापूर परिसरातील नागरिकांनी मिठाई वाटून पोलिस प्रशासनाचे आभारही मानले होते.

वाहनांची केली जाळपोळ

मात्र नक्षलवाद्यांनी नागरिकांच्या या समस्येचा विचार न करता केवळ स्वतःच्या फायद्यासाठी पुलाचे बांधकाम बंद पाडण्यासाठी वाहनांची जाळपोळ केली. त्यामुळे नाराज झालेल्या दोडगीर, शेडा, आसली, मुखनपल्ली, बिहाडघाट, कोंजेड, येलाराम, कामासूर, मुत्तापूर, तोडका, मिट्टीगुडम, पेठा, जोगनगुडा, कोडसापल्ली, देचलीपेठा, सिंधा, किष्टापूर, पेरकाभट्टी, दोडगीर, पत्तीगाव, लखनगुडा व शेडा या 16 गावांनी सोशल डिस्टन्सिंगचे भान राखत घेतलेल्या ग्रामसभेत नक्षल गावबंदीचा ठराव पारित केला. या ठरावात नक्षलवाद्यांना गावात येऊ न देणे तसेच त्यांना कोणत्याही प्रकारची मदत न करणे या दोन प्रमुख मुद्द्यांचा समावेश आहे.

जाणून घ्या : आता तरी थांबावे हे व्यसन, खर्‍यामुळे हे गाव बनले आहे ’हॉटस्पॉट’

ग्रामसभेला मिळणार प्रोत्साहनात्मक अनुदान

नक्षल गावबंदी ठराव संमत करणाऱ्या ग्रामपंचायतींचे ठराव जिल्हा प्रशासनाकडून मंजूर झाल्यानंतर शासन निर्णयाप्रमाणे या गावांच्या विकासासाठी 6 लाख रुपये प्रोत्साहनात्मक अनुदान म्हणून मंजूर केले जाणार आहे. नक्षल गावबंदी ठराव संमत करणाऱ्या ग्रामस्थांच्या कृतीचे जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी स्वागत केले असून, नक्षल गावबंदी योजनेंतर्गत या गावांच्या विकासासाठी गडचिरोली पोलीस दल सदैव या ग्रामस्थांच्या पाठीशी राहील तसेच पावसाळा सुरू होण्यापूर्वी या पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी गडचिरोली पोलीस दल प्रयत्न करेल, असे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: villegers warned naxals not to enter in Villages.