होम क्वारंटाइन शिक्के पुसून फिरत होते बिनधास्त; मग घडले असे...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 मार्च 2020

दोघा युवकांच्या हातावर होम क्वारंटाइनचे शिक्के मारण्यात आले होते. परंतु दोघे जण हातावरील शिक्के पुसून गावात फिरत असल्याची गंभीर बाब सोमवारी (ता.23) सकाळी 11 वाजता उघडकीस आली.

मोताळा (जि.बुलडाणा) : होम क्वारंटाइनचे आदेश झुगारत हातावरील शिक्के पुसून गावात फिरणाऱ्या वडगाव खंडोपंत येथील दोन युवकांविरुद्ध बोराखेडी पोलिसांनी सोमवारी (ता.23) गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे तालुकाभरात खळबळ उडाली आहे.

पोलिस सूत्रांनुसार, तालुक्यातील वडगाव खंडोपंत येथील दोन युवक पुणे येथून घरी आले होते. त्यांना रविवारी (ता.22) बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने घरातच अलगीकरण (होम क्वारंटाइन) मध्ये राहण्याचे निर्देश दिले होते. दोघा युवकांच्या हातावर होम क्वारंटाइनचे शिक्के मारण्यात आले होते. परंतु दोघे जण हातावरील शिक्के पुसून गावात फिरत असल्याची गंभीर बाब सोमवारी (ता.23) सकाळी 11 वाजता उघडकीस आली. 

हेही वाचा - तरी शेकडो नागरिक रस्त्यावर, मग चालला पोलिसांचा दंडुका

होम क्वारंटाइनच्या आदेशाचे उल्लंघन
या प्रकाराची माहिती मिळताच प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. दरम्यान, आरोग्य विभागाच्या पथकाने दोघांना पकडून बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. यातील एका युवकाचे वय अंदाजे 20 तर दुसऱ्याचे 21 वर्ष असल्याचे समजते. राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाहेरगावाहून आलेल्या व्यक्तींच्या बाबतीत प्रशासन खबरदारी घेत आहे. दरम्यान, वडगाव खंडोपंत येथील संबंधीत युवकांनी होम क्वारंटाइनच्या आदेशाचे उल्लंघन करणे गंभीर बाब आहे. 

आवश्‍यक वाचा - चप्पल विहिरीत पाण्यावर दिसली तरंगताना, मग आले हे सत्य समोर...

दोघा कर्मचाऱ्यांची तक्रार देण्यासाठी बोराखेडी पोलिसांत धाव
याची दखल घेत मोताळा तहसीलदार व्ही.एस. कुमरे यांनी पिंप्रीगवळी प्रा.आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज रामचंद्र पाटील व वडगाव खंडोपंत ग्रामपंचायतचे सचिव उद्धव सुभाषराव डुकरे यांना संबंधीत दोघा युवकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यामुळे दोघा कर्मचाऱ्यांनी तक्रार देण्यासाठी बोराखेडी पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज रामचंद्र पाटील यांच्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी दोघा युवकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार माधवराव गरुड, एपीआय राहुल जंजाळ यांच्या मार्गदर्शनात एएसआय विनोद शिंदे करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Violation of Home Quarantine Order in buldana district